भाईंदर : भाईंदरमध्ये सायंकाळच्या रहदारीच्या वेळी अरुंद रस्त्यावर वाहतूक रोखून वृक्ष छाटणी करण्यात आल्याने कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागला. वृक्ष छाटणीच्या कामाचे नियोजन करताना रहदारीच्या वेळेचा विचार केला जात नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या गणेशमूर्तींच्या आगमनास सुरुवात होणार आहे. गणेशमूर्तींच्या मार्गात अडथळे येऊ नयेत, यासाठी लोकप्रतिनिधींकडून आपापल्या प्रभागातील रस्त्यांवरील खड्डे बुजविणे तसेच वृक्षांच्या फांद्यांची छाटणी करण्यावर भर दिला जात आहे. त्यानुसार महापालिकेच्या उद्यान विभागाकडूनही विविध भागांत वृक्ष छाटणीची कामे सुरू करण्यात आली आहेत.मात्र, या कामांचे नियोजन आणि व्यवस्थापन योग्य पद्धतीने होत नसल्याने त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. भाईंदर पूर्वेकडील विमल डेअरी ते इंद्रलोक मार्गावरील अरुंद रस्त्यावर बुधवारी सायंकाळी रहदारीच्या वेळी वृक्ष छाटणी करण्यात आली. छाटणीचे काम सुरू असताना या मार्गावरील वाहतूक काही काळ रोखण्यात आली होती. त्यामुळे बस आणि रिक्षाने कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांना बराच वेळ वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागले. वाहनांची संख्या वाढत गेल्याने कोंडीची तीव्रता आणखी वाढली.

वृक्ष छाटणीची कामे शक्यतो कमी रहदारीच्या वेळेत करणे अपेक्षित असताना सायंकाळच्या गर्दीच्या वेळी रस्ता रोखून काम करण्यात आल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, छाटणीचे काम दुपारपासूनच सुरू करण्यात आले होते. मात्र, कामाला वेळ लागल्याने सायंकाळच्या वेळेपर्यंत ते सुरू राहिले आणि त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला, असे महापालिकेच्या उद्यान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

पाला-पाचोळा उचलण्याकडेही दुर्लक्ष

भाईंदरमध्ये वृक्ष छाटणीनंतर फांद्या आणि पालापाचोळा रस्त्याच्या कडेला ठेवण्यात येत आहे. मात्र, छाटणीचे काम पूर्ण होऊन दोन दिवस उलटूनही काही ठिकाणी हा पालापाचोळा उचलण्यात आलेला नाही. त्यामुळे परिसरात अस्वच्छता निर्माण होऊन दुर्गंधी पसरत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. छाटणीसोबतच निर्माण झालेला कचरा तातडीने उचलण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.