भाईंदर :-मासेमारी बंदी कालावधीत समुद्रात नौका घेऊन जाऊन मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांवर सागरी पोलिसांकडून ड्रोनद्वारे नजर ठेवली जात आहे. यात आढळून येणाऱ्या बोटींचे फोटो आणि चित्रीकरण करून संबंधितांवर थेट गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.
समुद्रातील जैवविविधता टिकून राहावी आणि माशांना प्रजननासाठी पुरेसा कालावधी मिळावा, यासाठी दरवर्षी १ जून ते ३१ जुलै या दोन महिन्यांच्या कालावधीत राज्य शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाकडून मासेमारीवर बंदी घालण्यात येते. त्यामुळे या कालावधीत समुद्रात जाणाऱ्या लहान-मोठ्या नौकांवर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक सागरी पोलिसांना देण्यात आले आहेत. भाईंदरच्या उत्तन परिसरात जवळपास ७०० मासेमारी नौका असल्याने येथील मच्छिमारांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना राबवत असते.
यंदा मासेमारी बंदी कालावधीची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, यासाठी सागरी पोलिसांकडून किनारपट्टीवर ड्रोनच्या साहाय्याने नजर ठेवली जात असल्याचे समोर आले आहे. ठाणे जिल्हा प्रशासन आणि जिल्हा मत्स्यव्यवसाय विभागाच्या माध्यमातून हे ड्रोन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या ड्रोनद्वारे किनारपट्टीवर वावरणाऱ्या बोटींचे फोटो आणि चित्रीकरण केले जात आहे. त्यानंतर या छायाचित्रांची मत्स्यव्यवसाय अधिकाऱ्यांकडून पडताळणी करण्यात येणार असून, दोषी आढळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.दरम्यान, किनारपट्टीवर सतत ड्रोनद्वारे पाहणी सुरू असल्याने स्थानिक मच्छिमारांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मासळी विक्रीवर निर्बंध आणू नयेत
मासेमारी बंदी कालावधीत उत्तनमधील मच्छिमार समुद्रात जात नसल्याचा दावा स्थानिक मच्छिमारांनी केला आहे. मात्र, बंदीपूर्वी पकडून आणलेली मासळी बोटीवरील बर्फगृहात साठवून ठेवण्यात आली आहे. ही मासळी किनाऱ्यावर आणण्यासाठी किंवा विक्रीसाठी नेणाऱ्या मच्छिमारांचे फोटो टिपून त्यांच्यावर कारवाई केली जात असल्याची तक्रार मच्छिमारांनी केली आहे. त्यामुळे प्रशासनाने कोणतीही कारवाई करण्यापूर्वी संपूर्ण पडताळणी करूनच पावले उचलावीत, अशी मागणी उत्तनच्या नगरसेविका शर्मिला बगाजी यांनी केली आहे.
