भाईंदर :- टोमॅटोच्या कॅरेटवरून झालेल्या किरकोळ वादात एका भाजी विक्रेत्याचा मृत्यू झाल्याची घटना भाईंदर मध्ये घडली आहे. या संदर्भात नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष लल्लन सिंह असे मृत्यू झालेल्या भाजी विक्रेत्याचे नाव आहे. २९ मे रोजी सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास हनुमान मंदिराजवळील भाजी मार्केटमध्ये टोमॅटोच्या क्रेटवरून दोन विक्रेत्यांमध्ये वाद झाला होता. वाद वाढल्यानंतर धीरज गुप्ता याने संतोष लल्लन सिंह यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केल्याचा आरोप आहे.

या हल्ल्यात संतोष सिंह गंभीर जखमी झाले.जखमी अवस्थेत त्यांना प्रथम जैन रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर प्रकृती गंभीर झाल्याने पुढील उपचारासाठी मीरा रोड येथील वॉकहार्ट रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच २ जून रोजी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी मृत संतोष सिंह यांचे भाऊ मनोज लल्लन सिंह यांनी नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी धीरज गुप्ता, रोशन गुप्ता, राजन गुप्ता आणि अंजित गुप्ता या चौघांना अटक केली आहे.

चारही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास नवघर पोलीस करत आहेत.