भाईंदर : विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत मतदारांकडून भरून घेण्यात येणारी गणना प्रपत्रे जमा करण्याची मुदत १७ ऑगस्ट रोजी संपली असतानाही, भाईंदर पश्चिम येथील मिरा भाईंदर महापालिकेच्या उर्दू शाळा क्रमांक ३१ मध्ये ही प्रपत्रे मोठ्या संख्येने सफाई कर्मचाऱ्याच्या ताब्यात आढळल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे मतदार पुनरीक्षणाच्या कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित झाले असून, या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

राज्यतील मतदार यादीतील नोंदींची पडताळणी करण्यासाठी विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहिमेंतर्गत घरोघरी जाऊन मतदारांकडून गणना प्रपत्रे भरून घेण्यात आली आहेत. या प्रपत्रांच्या माध्यमातून मतदारांची माहिती आणि यापूर्वीच्या मतदार यादीतील नोंदींची पडताळणी करण्यात येत आहे.या प्रक्रियेत गणना प्रपत्रे भरून घेऊन ती संबंधित निवडणूक यंत्रणेकडे वेळेत जमा करणे अपेक्षित होते.

मात्र, ४ सप्टेंबर रोजी भाईंदर पश्चिम येथील उर्दू शाळा क्रमांक ३१ येथे सफाई कर्मचारी निशा किरण जाधव यांच्या ताब्यात निवडणूक आयोगाची गणना प्रपत्रे असल्याचे दिसून आल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष सखोल मतदार पुनरीक्षणासाठी प्रपत्रे जमा करण्याची मुदत संपून बराच कालावधी उलटला असताना ही प्रपत्रे सफाई कर्मचाऱ्याकडे कशी आली, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

ही प्रपत्रे नेमकी किती आहेत, ती भरलेली आहेत की कोरी आहेत, तसेच ती सफाई कर्मचाऱ्याकडे कोणाच्या सूचनेनुसार देण्यात आली होती, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच संबंधित प्रपत्रे तातडीने ताब्यात घेऊन त्याबाबतचा अहवाल तयार करावा, अशी मागणी निवडणूक अधिकाऱ्यांकडे स्थानिक नागरिक तेजस्वी पाटील करण्यात आली आहे. तर सदर गणना प्रपत्र कुठेही गेलेली नसून तेथील बीएलओच्या ताब्यात होती. मात्र याबाबत तक्रार आल्यामुळे आम्ही चौकशी करत असल्याची प्रतिक्रिया ईआरओ नितीन चव्हाण यांनी दिली आहे.