वसई: वसई आणि भाईंदरला जोडणाऱ्या खाडीपुलाच्या मार्गातील अडथळे अद्याप दूर होण्याची चिन्हे दिसत नाही. वनविभागाला जागा हस्तांतरित झालेली नसताना आता रेल्वेने पुलावरील पाणजू गावासाठी जलवाहिन्या टाकण्यासाठी १२ कोटींची मागणी केलेली आहे. त्यामुळे पुलाच्या कामात आणखी एक अडथळा निर्माण झालेला आहे. मागील ९ वर्षांपासून या पुलाचे काम रखडलेले आहे.
वसई आणि भाईंदर शहरामध्ये खाडी असून त्यावरून लोकल ट्रेन जाण्यासाठी रेल्वेने पूल बांधला आहे. या खाडीवरून वाहनांना ये-जा करण्यासाठी एमएमआरडीएतर्फे पूल बांधण्यात येणार आहे. २०१३ मध्ये या कामाला मंजुरी मिळाली होती. मात्र मागील ९ वर्षांपासून पुलाच्या कामात अनेक अडथळे येत आहेत. आता या कामात रेल्वेने खोडा घातला आहे. नायगाव आणि भाईंदरमध्ये पाणजू बेट आहे. या बेटावर स्टेम प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा केला जातो. त्यांच्या जलवाहिन्या या जुन्या पुलावरून जातात. जुन्या पुलाची एक मार्गिका तोडण्यात आली असून दुसऱ्या मार्गिकेवरून या जलवाहिन्या नेण्यात आल्या आहेत. नवीन पुलासाठी जुना पूल तोडावा लागणार आहे. त्यामुळे जलवाहिन्या नवीन पुलावरून न्याव्या लागणार आहेत. त्यासाठी रेल्वेने १२ कोटी रुपयांची मागणी पाणजू ग्रामपंचायतीकडे केली आहे. पाणजू बेटावरील पाणजू ग्रामपंचायत छोटी असल्याने त्यांना एवढी रक्कम देणे शक्य नाही. परंतु रेल्वे अडून बसल्याने हे काम रखडले आहे. याबाबात खासदार राजेंद्र गावित आणि खासदार राजन विचारे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पाहणीदेखील केली होती. मात्र अद्याप तोडगा निघालेला नाही. पुलाच्या मार्गातील इतर अडथळे दूर झाले असून रेल्वेचा प्रश्न बाकी आहे, असे पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी सांगितले. रेल्वेने हे १२ कोटी माफ करावे यासाठी आम्ही रेल्वेच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत असे गावित यांनी सांगितले.
वनविभागाला अद्याप जागा हस्तांतरित नाही
पुलासाठी मोठय़ा प्रमाणावर कांदळवनाची जागा जाणार आहे. ती जागा वनविभागाच्या अखत्यारित आहे. या जागेच्या मोबदल्यात वनविभागाला ४.४४ हेक्टर जागा देण्यात येणार आहे. डहाणू तालुक्यातील वाडापोखरण येथे ही जागा देण्याचे निश्चित झाले आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांकडून ही जागा हस्तांतरित झालेली नाही. याबाबत वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना पत्र दिले आहे. जागा निश्चित असून ती हस्तांतरित झालेली नसल्याने पुलाच्या कामाला विलंब होत आहे. यासाठी महसूल विभागाचे सचिव, एमएमआरडीए आयुक्त, विभागीय कोकण आयुक्त आणि पालघर जिल्हाधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित करून तोडगा काढावा अशी मागणी आमदार ठाकूर यांनी महसूल मंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.
पालकमंत्री अनभिज्ञ
वसईकरांसाठी भाईंदर खाडीवरील पूल हा सर्वात मोठा प्रश्न आहे. मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांना याबाबत काहीच माहिती नाही. पुलाचे काम रखडले असून त्याला विलंब होत आहे. याबाबत पालकमंत्र्यांना विचारणा केली असता मला याबाबत फारशी माहिती नाही. मात्र माहिती घेऊन सर्व अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करेन, असे आश्वासन त्यांनी दिले.