भाईंदर :-भाईंदर पश्चिम येथील पंडित भीमसेन जोशी रुग्णालय येथे विनापरवानगी आणि आवश्यकता नसताना मुदतबाह्य औषधांचा पुरवठा झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून संबंधित संस्थेविरुद्ध तातडीने गुन्हा नोंदवण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.

काही दिवसांपूर्वी मंत्री सरनाईक यांनी रुग्णालयाला दिलेल्या भेटीदरम्यान एका खोलीत सक्षम फाउंडेशन या संस्थेकडून पुरविण्यात आलेल्या औषधांचा साठा आढळून आला. चौकशीत मार्च महिन्याच्या अखेरीस सुमारे १ कोटी ६५ लाख रुपयांच्या मुदत संपत आलेल्या औषधांचा पुरवठा करण्यात आल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, रुग्णालय प्रशासनाने अशा औषधांची कोणतीही मागणी केलेली नव्हती.

तसेच, रुग्णालयात अवघ्या ४८ तासांत मुदतबाह्य होणारी सर्जिकल औषधेही आढळून आली. ही औषधे रुग्णांना दिली गेली असती, तर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या संदर्भात मंत्रालयात ३० एप्रिल रोजी झालेल्या बैठकी आयोजित करण्यात आली होती.या बैठकीस आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर तसेच आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.दरम्यान या संदर्भात यापूर्वीच रुग्णालय व्यवस्थापनाने भाईंदर पोलीस ठाण्यात पत्र देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

नियमांचे उल्लंघन

सामाजिक दायित्व निधीअंतर्गत रुग्णालयांना औषधे किंवा साहित्य पुरविताना शासनाने निश्चित केलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. मात्र, या प्रकरणात नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून येत असून संबंधित संस्थेसह औषधे स्वीकारणाऱ्या रुग्णालय प्रशासनाची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.