भाईंदर : मिरा-भाईंदरमधील एमएमआरडीएने उभारलेल्या वादग्रस्त उड्डाणपुलावर आता मोकाट गुरांचाही मुक्त संचार सुरू झाल्याचे समोर आले आहे. पुलावर गुरे वावरत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून अपघाताचा धोका वाढला आहे.

मिरा-भाईंदर शहरातील मेट्रो मार्गासमांतर उभारण्यात आलेला उड्डाणपूल काही दिवसांपूर्वी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. दीपक हॉस्पिटल ते रेल्वे फाटकादरम्यान उभारण्यात आलेला हा पूल त्याच्या वेगळ्या रचनेमुळे देशभर चर्चेत आला होता. मात्र, या पुलावरील रस्ता काही ठिकाणी अचानक निमुळता होत असल्याने वाहनचालकांना आधीच सावधगिरीने वाहन चालवावे लागते. अशातच पुलावर मोकाट गुरांचा वावर सुरू झाल्याने अपघाताची शक्यता अधिक वाढली आहे.

याशिवाय गुरांकडून पुलावर शेण पडत असल्याने विशेषतः दुचाकीस्वार घसरून अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रकाराचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाले असून प्रशासनाने तातडीने मोकाट गुरांवर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.दरम्यान, मुख्य मार्गांवर जनावरे आणणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

मोकाट जनावरांवरील कारवाई अपुरी?

मिरा-भाईंदर शहरातील मोकाट जनावरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. जनावरे मोकाट सोडणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच रस्त्यावर आढळणारी जनावरे ताब्यात घेऊन गौशाळेत पाठविण्याची जबाबदारी कंत्राटदारावर सोपविण्यात आली आहे. प्रशासनाकडून नियमित कारवाई होत असल्याचा दावा केला जात असला, तरी शहरातील विविध रस्त्यांवर अजूनही मोकाट जनावरे दिसून येत असल्याने ही मोहीम प्रभावी ठरत नसल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे.