भाईंदर : भाईंदर मध्ये सार्वजनिक गणेशमूर्तीचे आगमन करताना तोल जाऊन मूर्ती कोसळल्याची घटना शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. या घटनेत मूर्तीचे छायाचित्र काढणारा एक तरुण जखमी झाला असून त्याच्या पायाला दुखापत झाली.

नवघर येथून भाईंदर पश्चिमेकडील शीतल छाया मित्र मंडळाच्या मंडपाकडे मूर्ती नेण्यात येत होती. त्यावेळी गोल्डन नेस्ट चौकात अचानक मूर्तीचा तोल गेल्याने ती खाली कोसळली. यामुळे मूर्ती भंगली गेली.दरम्यान  आगमनादरम्यान छायाचित्र काढण्यासाठी जवळ उभ्या असलेल्या एका तरुणाच्या पायाला यामध्ये दुखापत झाली.

ही किरकोळ दुखापत असून त्यावर उपचार केले जात आहे दरम्यान, मूर्ती रस्त्यावरील खड्ड्यामुळे कोसळल्याचा आरोप सुरुवातीला करण्यात आला होता. मात्र, घटनास्थळाची पाहणी केली असता संबंधित मार्गावर असा कोणताही खड्डा आढळून आला नाही. त्यामुळे मूर्ती खड्ड्यामुळे नव्हे, तर तोल गेल्याने कोसळल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.