भाईंदर : मिरा-भाईंदर शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेसमांतर वाहणारे प्रमुख नाले तुंबल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा मंदावून अनेक ठिकाणी पाणी साचत असून, परिस्थिती गंभीर झाल्यास त्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावर दहिसर ते भाईंदरदरम्यान मोठा नैसर्गिक नाला वाहतो. हा नाला पुढे भाईंदर खाडीत जाऊन मिळतो. शहरातील प्रमुख नाल्यापैकी हा एक असल्याने मिरा-भाईंदर महानगरपालिकेने गेल्या काही वर्षांत नाल्याच्या दोन्ही बाजूंना संरक्षक भिंती उभारल्या आहेत. तसेच दरवर्षी या नाल्याच्या साफसफाईवर लाखो रुपये खर्च केले जात आहेत.

मात्र, यंदाच्या मुसळधार पावसात या नाल्यात मोठ्या प्रमाणात गाळ व कचरा साचल्याने पाण्याचा प्रवाह अडथळला आहे. परिणामी नाल्यातील पाणी रस्त्यावर येऊ लागल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण होत आहे. मिरा रोड परिसरातील मोठ्या प्रमाणावरील पावसाच्या पाण्याचा निचरा याच नाल्याद्वारे होत असल्याने हा प्रवाह रोखला गेल्यास परिसर पाण्याखाली जाण्याचा धोका वाढला आहे.

ही परिस्थिती लक्षात घेऊन महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने तातडीने पुन्हा नाल्याची सफाई मोहीम हाती घेतली आहे. कर्मचारी साचलेल्या पाण्यात उतरून नाल्यातील कचरा व गाळ काढून पाण्याचा मार्ग मोकळा करण्याचे काम करत आहेत. नाल्यात साचलेला कचरा हा शहरातील नसून दहिसरच्या दिशेने वाहून आलेला असल्याचा दावा सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी केला आहे.

नालेसफाईवर प्रश्नचिन्ह

मिरा-भाईंदर शहरातील नाल्यांच्या साफसफाईसाठी महापालिकेने यंदा तीन कोटी रुपयांहून अधिक खर्च केला आहे. मात्र, तरीही शहरातील प्रमुख नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ आणि कचरा साचलेला दिसून येत आहे. त्यामुळे नालेसफाईचे काम प्रभावीपणे झाले नसल्याचा आरोप होत असून संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.