भाईंदर : रस्त्यावर उभारलेले ऊस रसाचे दुकान बंद करत असताना एका विक्रेत्याचा विजेचा झटका बसून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी काशिगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.गौतम सुतार असे मृत्यू झालेल्या विक्रेत्याचे नाव आहे. तो काशिगावच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ रस्त्यावर ऊस रस विक्रीचे काम करत होता. दरम्यान, गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास दुकान बंद करत असताना त्याला विजेचा झटका बसला. यात तो जमिनीवर कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच काशिगाव पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला व पुढील नोंद केली आहे.
ऊस विक्रेत्याने जवळील एका दुकानातून बेकायदेशीरपणे वीज जोडणी घेतली होती. सुरक्षेकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. तसेच, याच मार्गावरील इतर भाजी विक्रेत्यांनीही अशाच पद्धतीने वीज जोडणी घेतल्याने कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
