भाईंदर : जगभरात आपल्या वेगळ्या रचनेमुळे चर्चेत आलेल्या भाईंदरमधील एमएमआरडीएच्या उड्डाणपुलात अखेर अनेक बदल करण्यात आले असून हा पूल आता वाहतुकीसाठी सज्ज झाला आहे. पुलाच्या मध्यभागी झाडे, आधुनिक दुभाजक, रेडियम पट्ट्या आणि सुरक्षेच्या दृष्टीने विविध सुविधा उभारण्यात आल्या आहेत.

मिरा-भाईंदरमध्ये मेट्रो मार्गासमांतर उभारण्यात आलेल्या या पुलाच्या रचनेवरून यापूर्वी मोठा वाद निर्माण झाला होता. चार मार्गिकांचा हा पूल फाटकाजवळ उतरताना अचानक दोन मार्गिकांमध्ये कमी होत असल्याचा मुद्दा नागरिकांनी उपस्थित केला होता. या रचनेवरून एमएमआरडीएवर जोरदार टीका करण्यात आली होती.

वाद वाढल्यानंतर एमएमआरडीएने पूल सुरक्षित असून भविष्यातील वाहतूक लक्षात घेऊनच त्याची रचना करण्यात आल्याचा दावा केला होता. यासंदर्भात अधिकृत भूमिका आणि पत्रकही समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करण्यात आले होते. मात्र, नागरिकांचे समाधान झाले नाही. परिणामी, वाहतूक सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली. तसेच आयआयटी संस्थेचा सल्ला घेऊन पुलाच्या रचनेत काही बदल करण्यात आले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच दहिसर-काशिगाव मेट्रो पुलाच्या उद्घाटनप्रसंगी हा पूल योग्य असल्याचा दावा करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पुलाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचल्याने तो वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन एमएमआरडीएकडून करण्यात आले.

वाद कमी करण्यासाठी पुलाचे सौंदर्यीकरण करण्याचाही निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार पुलावर आधुनिक दुभाजक, मध्यभागी झाडे, रेडियम पट्ट्या तसेच सुरक्षाविषयक सुविधा उभारण्यात आल्या. ही कामे नुकतीच पूर्ण झाल्याची माहिती समोर आली असून लवकरच पुलाचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती उपमहापौर ध्रुव किशोर पाटील यांनी दिली.

रुग्णावाहिका ठेवण्याची मागणी

पुलाच्या रचनेबाबत अजूनही काही नागरिकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनाने रचनेत बदल केले असले तरी अपघाताची शक्यता पूर्णपणे कमी झालेली नसल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते करण पवार यांनी केला आहे. भविष्यात पुलावर अपघात झाल्यास तातडीने उपचार मिळावेत, यासाठी पुलावरील मोकळ्या जागेत चोवीस तास रुग्णवाहिका तैनात ठेवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.