भाईंदर : वाहनांवर कारवाई केल्यानंतर ती वाहने ठेवण्याकरिता कायमस्वरूपी जागा मिळावी म्हणून काशिमीरा येथील पोलीस विभागाकडून जागेचा शोध घेतला जात आहे. मात्र ठरवण्यात येत असलेल्या जागेत राजकीय हस्तक्षेप होत असल्यामुळे जागा मिळणे वाहतूक विभागाला कठीण होत असल्याची बाब समोर आली आहे.

शहरातील नियमबाह्य उभी केलेली वाहने, बेवारस वाहने वाहतूक पोलिसांकडून जप्त करण्यात येतात. ही वाहने काशिमीरा येथील सव्‍‌र्हे क्रमांक १५(३) वरील जागेत ठेवली जात आहेत. सव्‍‌र्हे क्रमांक १५(३)वरील जागेत कामगार रुग्णालय बांधण्यात येणार असल्याने ती जागा रिकामी करण्यात यावी, यासाठी ईएसआयसी (एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन) ने पालिका, जिल्हाधिकारी, वाहतूक शाखेकडे पत्रव्यवहार केला असता पालिकेने त्याला पर्यायी जागा म्हणून मीरा रोड येथील सव्‍‌र्हे क्रमांक २३३ वरील जागा उपलब्ध करून दिली आहे. सव्‍‌र्हे क्रमांक २३३ जागा ही राज्य शासनाच्या ताब्यात आहे.

मात्र प्रशासनातील समन्वयाच्या अभावामुळे वाहतूक विभागाला अद्यापही जागा उपलब्ध होत नाही आहे. तसेच कामगार रुग्णालयाचे काम रखडले असल्यामुळे वाहतूक विभागाला जागा मोकळी करण्याकरिता आतापर्यंत तब्बल तीन वेळा पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यामुळे आता गोदाममध्ये असलेल्या गाडय़ा कुठे घेऊन जाव्यात, असा प्रश्न वाहतूक विभागाला पडला आहे. याकरिता ठाणे ग्रामीण पोलीस विभागाकडून पत्रव्यवहार झाल्यानंतरदेखील दिरंगाई करण्यात आली होती; परंतु सातत्याने वाहतूक विभागाकडून पाठपुरवा केल्यानंतर त्याची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाने अप्पर तहसीलदार नंदकुमार देशमुख यांना पत्र पाठवून त्या जागेचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र या घटनेला घडून वर्षभराचा कालावधी लोटला असला तरी जागा मिळाली नसल्याने वाहतूक पोलिसांच्याच पदरात निराशा पडत आहे.