भाईंदर : उत्तन परिसरात गॅस संपल्याने मटन शिजवण्यासाठी चूल पेटवत असताना डिझेलचा भडका उडून गंभीररीत्या भाजलेल्या ३२ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिजु तौलन चौधरी असे मृत तरुणाचे नाव असून, याप्रकरणी उत्तन सागरी पोलीस ठाण्यात गुन्हाची नोंद करण्यात आली आहे.

तिजु चौधरी  हा २८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी उत्तन येथील मेन्डोसा हाऊस परिसरात गाईचे दूध काढण्यासाठी गेला होता. दूध काढल्यानंतर तो मटन घेऊन घरी परतला. मात्र, घरातील गॅस संपल्याने मटन शिजवण्यासाठी चूल पेटवायची होती. त्यासाठी त्याने कॅरल सेबस्टीन मेन्डोसा यांच्याकडे डिझेलची मागणी केली. कॅरल यांनी त्यांच्या वाहनासाठी आणलेल्या कॅनमधील काही डिझेल त्याला दिले.

डिझेल घेऊन घरी परतल्यानंतर काही वेळातच त्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याचे शेजाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी दरवाजातून आत डोकावून पाहिले असता, चूल पेटलेली आणि त्यावर ठेवलेले पातेले उलटलेले दिसले. तसेच तिजु हा गंभीररीत्या भाजलेल्या अवस्थेत जमिनीवर पडलेला होता. शेजाऱ्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच उत्तन सागरी पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणल्यानंतर तिजु याला रुग्णवाहिकेतून भाईंदर पश्चिम येथील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान २९ ऑक्टोबर रोजी पहाटे २.२५ वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेचा पुढील तपास उत्तन सागरी पोलीस करीत आहेत.