भाईंदर :- भाईंदर मधील एमएमआरडीएच्या वादग्रस्त उड्डाणपुलावर उद्घाटनाच्या अवघ्या काही दिवसातच चार चाकी वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणीही गंभीर दुखापत झाली नाही.
मिरा-भाईंदरच्या मुख्य मार्गावर मेट्रो प्रकल्पासह एमएमआरडीएने तीन उड्डाणपुलांची उभारणी केली आहे. यापैकी दीपक हॉस्पिटल ते रेल्वे फाटक परिसरातील उड्डाणपूल त्याच्या रचनेमुळे चर्चेत राहिला आहे. चार मार्गिकांनी सुरू होणारा हा पूल पुढे अचानक दोन मार्गिकांचा होत असल्याने सुरुवातीपासूनच त्यावर वाहतूक तज्ज्ञ, नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने काही उपाययोजना करून प्रशासनाने २२ जून २०२६ रोजी हा पूल वाहतुकीसाठी खुला केला.
पूल सुरू झाल्यानंतर त्यावरील वाहतूक वाढली आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्री एका चारचाकी वाहनचालकाला पुलावरील वळण आणि रस्त्याचा अंदाज न आल्याने वाहन दुभाजकावर आदळले. अपघातात वाहनाचे नुकसान झाले. मात्र चालक व अन्य प्रवासी सुखरूप बचावले.
या अपघाताचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात वायरल झाला असून पुलाच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. भविष्यात मोठी दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना आखण्याची मागणी केली जात आहे.
