वसई: वसई-विरार महापालिकेचा घनकचरा विल्हेवाट प्रकल्प ठप्प झाल्याने कचराभूमीवर (डंपिंग ग्राऊंड) कचऱ्याचे मोठे डोंगर तयार झाले आहेत. या निष्काळजीपणामुळे रविवारी रात्री भोयदापाडा येथील कचराभूमीला पुन्हा एकदा भीषण आग लागली. तब्बल सहा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाला ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र, या आगीमुळे पसरलेल्या धुरांच्या लोटामुळे महापालिका प्रशासनाचा ‘सावळा गोंधळ’ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, आगीमागे नेमके काय कारण आहे, याबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
वसई पूर्वेच्या भोयदापाडा येथे पालिकेची सुमारे ४० एकर जागेत पसरलेली कचराभूमी आहे. वाढत्या नागरीकरणामुळे शहरात दररोज तब्बल १२०० मेट्रिक टनांपेक्षा जास्त कचरा गोळा होतो. मागील १५ वर्षांपासून योग्य विल्हेवाट न झाल्याने येथे कचऱ्याचे भलेमोठे डोंगर साचले आहेत. तब्बल १५ वर्षांनंतर पालिकेने ‘बायोमायनिंग’ प्रकल्प सुरू केला. कंत्राटदाराचा हलगर्जीपणा आणि दिरंगाईमुळे महापालिकेची विल्हेवाटीची प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कचराभूमीवर कचऱ्याचे ढिगारे वाढतच आहेत. या साचलेल्या कचऱ्यामुळे रासायनिक वायू तयार होऊन सातत्याने आगी लागण्याच्या घटना समोर येत आहेत.
एकीकडे नुकताच महापालिकेच्या घनकचरा विल्हेवाट प्रक्रियेतील आर्थिक घोटाळा उघडकीस आला असतानाच, दुसरीकडे या आगीच्या घटनांमुळे पालिका प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने यावर तात्काळ कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.
औद्योगिक कचरा टाकल्याचा गंभीर आरोप
या कचराभूमीवर केवळ घरगुती कचरा नसून आजूबाजूच्या औद्योगिक क्षेत्रातील (इंडस्ट्रियल) रासायनिक कचरा नियमबाह्यपणे टाकला जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे तालुकाप्रमुख काकासाहेब मोटे यांनी केला आहे. याबाबत आम्ही घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे तक्रारी करतो मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. रविवारी रात्री लागलेली आग गंभीर स्वरूपाची असून ही आजवरची सर्वात मोठी भीषण आग असल्याचे मोटे यांनी सांगितले.
आरोग्याचा गंभीर प्रश्न
कचराभूमीला लागूनच भोयदापाडा आणि वाघराळपाडा या मोठ्या नागरी वस्त्या आहेत. या आगीमुळे आणि सातत्याने निघणाऱ्या धुरामुळे संपूर्ण परिसरात प्रदूषणाचे साम्राज्य पसरते. धुरामुळे नागरिकांना दमा, सर्दी, डोळ्यांची जळजळ आणि मळमळ अशा त्रासांना सामोरे जावे लागत आहे. कचऱ्यातून निघणाऱ्या दूषित पाण्यामुळे परिसरात डासांचे प्रमाण वाढले असून साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.कचरा वाहून आणणाऱ्या वाहनांच्या रांगांमुळे सर्वत्र दुर्गंधी पसरून स्थानिक रहिवाशांचा श्वास कोंडत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
कचराभूमीवर साचलेल्या कचऱ्यात मिथेन वायू तयार होऊन आगी लागत आहेत. असे प्रकार टाळण्यासाठी कचरा विल्हेवाट प्रक्रिया राबविण्यावर महापालिकेचा भर आहे. लवकरच पुन्हा एकदा बायोमाइनिंग प्रकल्प सुरू करून येथील साचलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाईल.: जितेंद्र नाईक, सहायक आयुक्त ( घनकचरा व्यवस्थापन)
