वसई: मागील तीन महिन्यांपासून बंद असलेली भोयदापाडा ते नायगाव दरम्यानची महापालिका बस सेवा अखेर पूर्ववत करण्यात आली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांचे कारण पुढे करत परिवहन विभागाने ही सेवा अचानक थांबवली होती, ज्यामुळे स्थानिक नागरिक, शाळकरी विद्यार्थी आणि नोकरदारांची प्रचंड गैरसोय होत होती. ही सेवा तातडीने सुरू करण्याची मागणी सातत्याने केली जात होती. अखेर बस धावू लागल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

​वसई पूर्वेतील भोयदापाडा ते नायगाव दरम्यानचा हा रस्ता अतिशय महत्त्वाचा मानला जातो. नायगाव पूर्वेतून टिवरी फाटा ते भोयदापाडा असा जाणारा मुख्य मार्ग वसई आणि विरार शहरांना जोडतो. या मार्गाच्या दुतर्फा अनेक मोठी निवासी संकुले, शाळा, महाविद्यालये आणि मॉल्स असल्याने येथे दररोज हजारो नागरिक व वाहनांची मोठी वर्दळ असते. याशिवाय या मार्गावर टिवरी, राजावळी, वाघराळपाडा यांसारखे अनेक गावपाडे वसलेले आहेत. या ग्रामीण भागातील नागरिकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी वसई-विरार महापालिकेच्या परिवहन विभागाने ही बस सेवा सुरू केली होती.

​मात्र, पावसाळ्यात रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे बस चालवणे धोकादायक असल्याचे कारण देत प्रशासनाने तीन महिन्यांपूर्वी ही सेवा अचानक बंद केली होती. यामुळे प्रवाशांना खाजगी वाहनांचा आणि महागड्या रिक्षांचा आधार घ्यावा लागत होता. ही समस्या लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते चेतन घरत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी परिवहन विभागाकडे पाठपुरावा करून बस सेवा त्वरित सुरू करण्याची आग्रही मागणी केली होती. प्रशासनाने सेवा पूर्ववत केली असली, तरी सध्या सोडण्यात येणाऱ्या बसेसची संख्या अपुरी असल्याचे चेतन घरत यांनी सांगितले.

​”नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन आम्ही भोयदापाडा – नायगाव मार्गावर बस सेवा पुन्हा सुरू केली आहे. सध्या रस्त्यांची बिकट अवस्था असली, तरी रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर बसेसच्या फेऱ्या आणि संख्या आणखी वाढवली जाईल.”- धैर्यशील जाधव, परिवहन व्यवस्थापक