वसई: वसई पश्चिमेतील भुईगाव-अर्नाळा रस्त्यालगत असणाऱ्या पेट्रोल पंपामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीविरोधात ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, पोलिसांनी वाहने उभी करण्यासाठी सोय करण्याचे तसेच कारवाईचे निर्देश पेट्रोल पंप चालकाला दिल्यानंतर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.

वसई विरार शहराच्या पश्चिम पट्ट्याला जोडणारा भुईगाव-अर्नाळा हा अतिशय महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र, या रस्त्यालगत असणाऱ्या पेट्रोल पंपामुळे चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. सीएनजी भरण्यासाठी मुख्य रस्त्याच्या एका बाजूला चारचाकी वाहनांची तर दुसऱ्या बाजूला रिक्षांची लांबच लांब रांग लागलेली असते. रांगेतून अचानक रिक्षा पेट्रोल पंपाच्या दिशेने वळत असल्याने या ठिकाणी लहान-मोठे अपघात होत असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांनी केल्या होत्या. तसेच अनेकदा यामुळे वाहन चालकांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत होते.

याच पार्श्वभूमीवर सीएनजी पंपाचा हा अडथळा दूर करण्यासाठी किंवा पेट्रोल पंप रात्री सुरू अथवा बंद ठेवण्याबाबत वसई जनशक्ती आघाडी संघटनेच्या वतीने २ ऑक्टोबर रोजी वसई ते अर्नाळा मुख्य रस्त्यावर ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्याचा इशारा पोलीस ठाण्यात अर्ज देऊन देण्यात आला होता.

या अर्जाची दखल घेत २९ सप्टेंबर रोजी पोलीस अधिकारी, नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि वसई विभागाच्या वाहतूक शाखा अधिकाऱ्यांनी भुईगाव पोलीस चौकी येथे बैठक घेऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. यावेळी सीएनजी भरण्यासाठी येणाऱ्या वाहनांमुळे मुख्य रस्त्यावर कोंडी होऊन अपघाताची शक्यता नाकारता येत नसल्याचे यात स्पष्ट झाले आहे.

त्यामुळे सीएनजी गॅस भरण्यासाठी येणाऱ्या चारचाकी वाहनांची किंवा रिक्षांची रांग मुख्य रस्त्यावर लागणार नाही, यासाठी पेट्रोल पंप मालकाने स्वतःच्या स्तरावर पार्किंग किंवा योग्य जागेची व्यवस्था करावी, असे निर्देश पोलिसांनी दिले आहेत. यापुढे सीएनजीसाठी मुख्य रस्त्याच्याकडेला वाहनांच्या रांगा दिसल्यास पेट्रोल पंप चालकावर रीतसर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी या नोटीसद्वारे दिला आहे. त्यामुळे ग्रामस्थांचा आंदोलन तात्पुरते स्थगित केले असल्याची माहिती मॅकेन्सी डाबरे यांनी दिली.