विरार: माहेर गाठण्यासाठी दुचाकीवरून जर्मनी ते भाईंदर पतीसह १५६ दिवसांत; २४ हजार किमीचा पल्ला पार | Bicycling from Germany to Bhayandar with husband in 156 days amy 95 | Loksatta

विरार: माहेर गाठण्यासाठी दुचाकीवरून जर्मनी ते भाईंदर पतीसह १५६ दिवसांत; २४ हजार किमीचा पल्ला पार

जिद्द आणि संकल्प दृढ असेल तर काहीही साध्य करता येऊ शकते. याचे उदाहरण भाईंदरमध्ये राहणाऱ्या आणि जर्मनीत वास्तव्याला असलेल्या मेधा राय हिने दिले आहे.

विरार: माहेर गाठण्यासाठी दुचाकीवरून जर्मनी ते भाईंदर पतीसह १५६ दिवसांत; २४ हजार किमीचा पल्ला पार
(मेधा राय आणि हॉक विक्टर)

जिद्द आणि संकल्प दृढ असेल तर काहीही साध्य करता येऊ शकते. याचे उदाहरण भाईंदरमध्ये राहणाऱ्या आणि जर्मनीत वास्तव्याला असलेल्या मेधा राय हिने दिले आहे. तिने आपल्या लग्नानंतर माहेरी जाण्यासाठी चक्क जर्मनी ते भाईंदर असा पतीसह प्रवास करत नवा विक्रम प्रस्थापित केला. त्यांनी १८ देशांतून २४ हजार किमीचा प्रवास करत १५६ दिवसांनी तिने भाईंदर गाठले. तेथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

भाईंदरच्या जैसल पार्कमध्ये राहणारी मेधा राय (३०) ही गेल्या सात वर्षांपासून जर्मनीत राहत आहे. तिथे तिने शिक्षण पूर्ण करत नोकरी करण्याचा निर्णय घेतला. इथेच तिची ओळख हॉक विक्टरशी झाली. दोघांमधील मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी या वर्षीच जर्मनीतच कोर्टमॅरेज केले. करोनाकाळातील निर्बंधामुळे लग्नाच्या वेळी मेधाचे कुटुंबीय जर्मनीत उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी दोघांनी बाईकने भारतात जायचे ठरवले आणि १८ देशांचा प्रवास करत या जोडप्याने २४ हजार किलोमीटरचा प्रवास करत १५६ दिवसांनी दोघांनी शनिवारी भाईंदर गाठले. इथे तिच्या कुटुंबीयांनी आणि परिसरातील रहिवाशांनी त्यांचे जंगी स्वागत केले.

मेधाचे कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांनी आपल्या भारतीय संस्कृतीनुसार औक्षण करून या दोघांचे स्वागत केले.मेधाने आपल्या प्रवासाबद्दल सांगितले की, जर्मनीहून येताना आम्ही १८ देशांतून प्रवास केला. बहुतांश ठिकाणी आम्ही तंबू उभारून राहत होतो. तर जेवण स्वत: तयार करत असू. सर्वच देशांतील नागरिकंनी त्यांना खूप चांगली मदत केली. विशेषत: पाकिस्तान आणि इराणमध्ये आम्हाला खूप प्रेम मिळाले असे मेधाने आवर्जून सांगितले. हा प्रवास असाच सुरू ठेवून जगभर बाईकने फिरण्याचा आपला मानस असल्याचे मेधा हिने सांगितले.

कसा झाला प्रवास?
मेधा आणि तिच्या पतीने २६ जून रोजी जर्मनमधील, मेडब्ली शहरातून आपला प्रवास सुरू केला, जर्मनी, डेन्मार्क, नॉर्वे, ऑस्ट्रिया, झेक प्रजासत्ताक, क्रेएशिया . दक्षिणेकडे बाल्कन देश बोस्निया आणि हर्जेगोविना, अल्बेनिया, मॉन्टेनेग्रो, ग्रीस, टर्की, जॉर्जिया, आर्मेनिया, इराण, पाकिस्तान आणि शेवटी २६ नोव्हेंबर रोजी ती भारतातील भाईंदर येथील आपल्या घरी पोहचली. तिचा हा प्रवास १५६ दिवसाचा होता.

पाकिस्तानात चांगला अनुभव
मेधा आणि तिचा पती हॉक यांनी सर्वात चांगला अनुभव पाकिस्तानात आल्याचे सांगताना ते म्हणाले की, पाकिस्तानी नागरिकांनी आमचे खूप प्रेमाने आणि आदराने स्वागत केले. जेव्हा कळाले की मी भारतातील आहेत, तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. पाकिस्तानातील नागरिकांनी मला अनेकदा चहा पिण्याचा आग्रह केला, ते म्हणाले की तुम्ही चहा न पिता गेलात तर आम्हाला वाईट वाटेल. तुम्ही भारतामध्ये जाऊन असे नको म्हणायला की पाकिस्तानमधील नागरिकांनी भारतीयांना चहापण नाही विचारला, असा अनुभव मेधाने सांगितला.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 14:35 IST
Next Story
शहरबात : फेरीवाल्यांना ‘अधिकृत’ करणारी योजना