भाईंदर : भाईंदर पूर्व-पश्चिम परिसराला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर अनेक ठिकाणी मोठं मोठे खड्डे पडल्याचे दिसून येत आहे. यामुळे वेगात प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वार खड्ड्यात आदळून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी मिरा-भाईंदर महापालिकेने इंदिरा गांधी उड्डाणपुलाची उभारणी केली होती. पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणारा हा एकमेव प्रमुख मार्ग असल्यामुळे येथे दिवस-रात्र वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र, पावसाच्या आगमनानंतर पुलावर ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाले असून त्यामुळे वाहतुकीस गंभीर धोका निर्माण झाला आहे.
यापूर्वीही या पुलावर अनेक अपघात झाले असून काही घटनांमध्ये जीवितहानीसुद्धा झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी तातडीने खड्डे भरण्यात यावे अशी मागणी केली आहे. दरम्यान, उड्डाणपुलावरील खड्ड्यांबाबत तक्रार प्राप्त झाल्याचे आणि खड्डे तातडीने भरण्याचे आदेश कंत्राटदाराला देण्यात आल्याचे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले आहे.
प्रशासनावर संताप
मिरा-भाईंदर शहरातील खड्ड्यांची समस्या दूर करण्यासाठी महापालिकेने टोल फ्री क्रमांकासह विविध डिजिटल सेवा सुरू केल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात, शहरातील बहुतांश रस्त्यांवर खड्ड्यांची स्थिती जशीच्या तशी आहे.पावसाळ्यात खड्डे भरून काढणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असते. यासाठी प्रत्येक वर्षी अर्थसंकल्पात विशेष निधीची तरतूद केली जाते. तरीही यंदा मुख्य वाहतुकीच्या रस्त्यांवरही खड्डे भरले गेले नसल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.