वसई: नालासोपारा पूर्वेच्या तुळींज रोड वरील रस्त्यावर पाण्याच्या टॅंकरची दुचाकीला धडक बसली आहे. या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.करण देसाई (२४) असे मृतांचे नाव आहे.गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली.नालासोपारा पूर्वेच्या भागातून तुळींज रस्ता गेला आहे या रस्त्यावर दररोज मोठ्या संख्येने वाहनांची वर्दळ असते यात विविध ठिकाणच्या भागात पाणीपुरवठा करणारे टँकर ही भरधाव वेगाने धावत आहेत गुरुवारी या रस्त्यावर बारा वाजण्याच्या सुमारास एका दुचाकीस्वारालाएमएच ४८ डी एस ००८६ या टॅंकरची धडक लागली.
धडक जोराची असल्याने या दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. करण देसाई (२४ ) असे या तरुणाचे नाव असून कपोल नगर आचोळे रोड येथे राहत आहे. अपघातानंतर टॅंकर चालक पळून गेला असून पोलिसांनी टॅंकर जप्त केला आहे. याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू असल्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी सांगितले आहे.या घटनेनंतर काही काळ या रस्त्यावर वाहतूक कोंडी व नागरिकांची गर्दी झाली होती.
बेदरकार टॅंकरला आवर घाला
वसई विरार शहरात बेदरकारपणे टॅंकर चालविल्यामुळे अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहे. सातत्याने अशा बेदरकारपणे चालविल्या जाणाऱ्या टॅंकरमुळे अपघात घडत असल्याने त्यांना आवर घालणे गरजेचे बनले आहे.टॅंकरची तपासणी करून कालबाह्य झालेले व बेदरकारपणे चालक व मालक यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.