भाईंदर :- मिरा-भाईंदर महापालिकेसाठी भाजपने पुन्हा अमराठी महापौराची निवड केल्यामुळे मराठी एकीकरण समिती संतप्त झाली आहे. या निषेधार्थ येत्या ३ फेब्रुवारी रोजी शहरात पुन्हा ‘मराठी आंदोलन’ पुकारण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे.
मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपने एकहाती सत्ता स्थापन केली आहे. त्या अनुषंगाने शुक्रवारी पक्षाकडून महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवार जाहीर करण्यात आले. त्यामध्ये डिंपल मेहता यांची महापौरपदी, तर ध्रुवकिशोर पाटील यांची उपमहापौरपदी निवड करण्यात आली आहे. पक्षाकडे असलेल्या संख्याबळानुसार येत्या ३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीत औपचारिक प्रक्रिया पार पडून ही निवड निश्चित होणार आहे.
मात्र, वारंवार मागणी करूनही भाजपने मराठी भाषिक महापौर न दिल्याने मराठी एकीकरण समितीकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या निषेधार्थ ३ फेब्रुवारी रोजी शहरात तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाने पाठिंबा दिला आहे. या संदर्भात समितीने पोलीस आयुक्तालय व महापालिका प्रशासनाला आंदोलनाबाबतचे पत्र दिले आहे. शहरात मराठी भाषेचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप समितीने केला आहे. ४६ मराठी भाषिक लोकप्रतिनिधी निवडून आले असतानाही गुजराती महापौर शहरावर लादला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. धक्कादायक बाब म्हणजे प्रस्तावित महापौरांना भारत कधी स्वतंत्र झाला, याचीही माहिती नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे मराठीसाठी हुतात्मा झालेल्या वीरांच्या सन्मानार्थ हे आंदोलन करण्यात येत असल्याचे समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
४६ नगरसेवकांना एकत्र येण्याचे आवाहन
मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत ९५ पैकी ४६ नगरसेवक हे मराठी भाषिक निवडून आले आहेत. यावेळी महापौर पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे. भाजपमध्ये स्थानिक आगरी-कोळी व मराठी भाषिक अनेक अनुभवी महिला नेत्या असतानाही पक्षाने गुजराती उमेदवाराची निवड करून मराठी भाषिकांना डावलल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे शहरात होणाऱ्या आंदोलनात या ४६ नगरसेवकांनी मराठीसाठी एकत्र यावे, असे आवाहन मराठी एकीकरण समितीकडून करण्यात आले आहे.
यापूर्वीही हिंदी मराठी वादामुळे आंदोलन
मीरा भाईंदर शहरात यापूर्वीही मराठी एकीकरण समिती, मनसे, शिवसेना (ठाकरे गट) यांच्यासह इतर पक्षांनी हिंदी भाषिक व्यापाऱ्याने मराठी बोलण्यास नकार दिल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांवर झालेल्या कारवाईचा निषेध म्हणून आंदोलन केले होते. त्यानंतर पुन्हा अमराठी महापौर निवडीच्या उद्या वरून आंदोलन करण्यात येणार आहे.

