वसई: वसई तहसील कार्यालयावर भाजप पक्षातील महिला कार्यकर्त्यांनी जनआक्रोश आंदोलन पुकारले होते. आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी या मोर्च्याचे प्रतिनिधित्व केले असून यावेळी काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या धोरणाविरोधात महिलांनी तीव्र निषेध नोंदवला.
संसदेच्या विशेष अधिवेशनात नव्या दुरुस्तीसह नारी शक्ती वंदन अधिनियम मांडण्यात आले होते. मात्र विधेयक मंजूर होण्यासाठी लागणारे दोन तृतीयांश मतदान न झाल्याने ते नामंजूर झाले. या विरोधात गुरुवारी वसई तहसील कार्यलयावर वसई विधानसभा मतदारसंघाच्या आमदार स्नेहा दुबे-पंडित यांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश आंदोलन पुकारण्यात आले होते.
यावेळी महिलांनी ‘नारी शक्ति ने मांगा अधिकार, कांग्रेस ने ठगा हर बार’ असे संदेश असलेले बॅनर हाती घेत नव्या विधेयकाला विरोध केल्याप्रकरणी काँग्रेस विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच महिलांच्या बाबतीत काँग्रेसची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
तर ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ हे महिलांच्या राजकीय सक्षमीकरणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र काँग्रेस आणि त्याच्या सहयोगी पक्षांनी हे विधेयक मंजूर होऊ दिले नाही. हा महिलांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न असल्याचा दावा भाजप कार्यकर्त्यांनी केला. या आंदोलनामुळे तहसील कार्यालय परिसरात काही काळ गोंधळाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांचा बंदोबस्तही यावेळी तैनात करण्यात आला होता.
