वसई: पावसाच्या अवकृपेमुळे राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. तर दुसरीकडे भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शाही जेवणावळीच्या सोहळ्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याबाबत शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी व्हिडिओद्वारे त्यांच्या या कृतीचा निषेध नोंदवला आहे.
एल निनोमुळे राज्यात यंदाच्या वर्षात अत्यंत कमी प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली आहे. जुलै महिना सोडल्यास इतर महिन्यात फारसा पाऊस पडलेला नाही. यामुळे राज्यातील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. तर दुसरीकडे अपुरा पाऊस आणि वाढत्या उष्णतेमुळे शेतीवरही मोठा परिणाम झाला आहे. मराठवाडा, विदर्भ जिल्ह्यात पिके करपून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
या परिस्थितीवर मात करण्यासाठी मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये ट्रिगर-१ नुसार दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र, असे असताना सोशल मिडियावर आमदार नरेंद्र मेहता यांच्या वाढदिवसाच्या सोहळ्याचा व्हायरल होणारा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
तर शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी असंवेदनशील सत्ताधारी या शीर्षकासह आमदार नरेंद्र मेहता यांच्या या कृतीचा निषेध करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. बळीराजा दुष्काळाच्या झळा सोसत असताना शाही सोहळे आयोजित करणाऱ्या सत्ताधाऱ्यांची ही कोणती संवेदनशीलता, असा सवालही त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.
