भाईंदर :-मिरा-भाईंदरमधील भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. तक्रारदार अजगर अली व्होरा यांनी सोहम डेव्हलपर आणि सेवेन इलेव्हन या कंपन्यांवर जमीन बळकावल्याचा व बेकायदेशीर बांधकाम केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी व्होरा यांनी थेट मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन तक्रार केली आहे.
भाईंदरच्या इंद्रलोक परिसरातील सर्व्हे क्र. २४० मधील जागा स्वतःची असल्याचा दावा व्होरा यांनी केला आहे. या जागेवर ‘सोहम डेव्हलपर’ आणि ‘सेव्हन इलेव्हन’ कंपनीने बेकायदेशीर अतिक्रमण करून सातबाऱ्यावर नाव चढवले होते, असा आरोप त्यांनी केला. व्होरा यांनी पाठपुरावा केल्यानंतर महसूल विभागाने सातबारावरून हे नाव हटवले. सातबाऱ्यावरील नाव हटवल्यानंतरही मिरा-भाईंदर महापालिकेने या बांधकामाची परवानगी रद्द केली नाही, असा आरोप व्होरा यांनी केला आहे. यासाठी त्यांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली आहे. दरम्यान, ८ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन महसूल विभागातील या गैरप्रकाराची माहिती दिल्याचे व्होरा यांनी सांगितले. मोदी हे आपले बाल मित्र असल्याचा दावाही व्होरा यांनी केला. आपल्याला ही तक्रार त्यांना द्यायची नव्हती. आमच्या मैत्री पुढे या जागेचे काहीच मोल नाही. मात्र महसूल विभागात मोठा घोळ सुरु असून मागील पंधरा वर्षांपासून आपण लढत असल्याचे त्यांना सांगितले आहे. त्यावरून मोदींनी देखील संपूर्ण माहिती घेणार असल्याचे सांगितले असल्याचा दावा व्होरा यांनी केला आहे.
‘सेव्हन इलेव्हन’ ही कंपनी नरेंद्र मेहता यांच्या कुटुंबाशी संबंधित असल्याचा आरोप तक्रारदाराने केल्यामुळे मेहता यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.तर याप्रकरणी मेहता यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
नेमके प्रकरण काय?
तक्रारदाराच्या आरोपानुसार, भाईंदरमधील इंद्रलोक परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जुने मित्र अजगर अली व्होरा (८१) यांची खाजगी जागा भाईंदर इंद्रलोक – सर्वे क्रमांक २४० आहे. ही जागा त्यांनी सुमारे चाळीस वर्षांपूर्वी खरेदी केली होती. मात्र, सदर जागेवर सोहम डेव्हलपर आणि ‘सेव्हन इलेव्हन’ संस्थेकडून अतिक्रमण करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर ही जागेचा बेकायदेशीररित्या सातबारा आपल्या नावावर करून घेतल्याचा आरोप आहे.
