वसई:- नुकत्याच पार पडलेल्या वसई विरार महापालिका निवडणुकीत  बहुजन विकास आघाडीने ७१ जागा जिंकून आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तर भाजपने ही ४३ जागा जिंकून दुसऱ्या स्थानी आहे.  महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक बिनविरोध होऊ नये, यासाठी बविआसह भाजपानेही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मात्र भाजपचे आमदार राजन नाईक यांनी महापौर निवडीच्या दिवशी आमची रणनीती काय असेल ते दाखवू या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

वर्षभरापूर्वी झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणूकी भाजपने वसई विरार शहरात चांगलीच मुसंडी मारली होती. विशेषतः विधानसभा निवडणुकीत बविआचे तिन्ही आमदार पराभूत झाले होते. त्या पराभवानंतर बविआने सावरत नुकत्याच पार पडलेल्या वसई विरार महापालिका निवडणुकीत विजय मिळवित आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. ११५ जागापैकी बविआ ७०, काँग्रेस १, भाजपा ४३, शिवसेना शिंदे गट १ अशा जागा मिळाल्या आहे.

या निवडणुकीनंतर आता महापौर निवडीचे वेध लागले आहेत. ३ फेब्रुवारीला महापौर व उपमहापौर यांची निवड होणार आहे. बविआकडे स्पष्ट बहुमत असल्याने  सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होईल असे वाटले होते. मात्र ही बिनविरोध होऊ नये यासाठी बविआसह भाजपने ही महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज सादर केले आहे.

महापौर पदासाठी बविआतर्फे अजीव पाटील, प्रफुल्ल साने आणि निशाद चोरघे, तर भाजपकडून अॅड. दर्शना त्रिपाठी यांनी अर्ज सादर केले आहेत. उपमहापौरपदासाठी बविआकडून कन्हैया भोईर,  मार्शल लोपीस तर भाजपतर्फे नारायण मांजरेकर यांनी अर्ज दाखल केले आहेत.

या अर्जानंतर आता राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा ऑपरेशन लोट्सची चर्चा सुरू झाली आहे. आमदार राजन नाईक यांनी सुद्धा महापौर निवडणूकीच्या दिवशी आमची रणनीती काय असेल ते स्पष्ट करू असे सांगितले आहे.

राजन नाईक काय म्हणाले ?

महापौर व उपमहापौर पदासाठी भाजपने ही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ज्यादिवशी मतदान होईल त्यादिवशी तुम्हाला कळेल की आमची रणनीती काय असेल.  आमच्याकडे संख्याबळ कमी कुठे आहे? ४३ आणि १ असे एकूण  ४४ संख्याबळ आहे. बहुमतापासून फक्त १४ जागा कमी आहेत. मागील एका निवडणुकीत जनआंदोलनाने २१ जागा निवडून आणल्या होत्या आता तर ४४ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे मतदान जेव्हा होईल तेव्हा आमची रणनीती काय असेल हे स्पष्ट होईल.त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांनी ऑपरेशन लोट्स चे संकेत दिले असल्याची चर्चा सुरू झाली आहे.