Bihar Assembly Election Results 2025 Video : वसई: महाराष्ट्रात एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत असताना. दुसरीकडे मात्र शुक्रवारी जाहीर झालेल्या बिहार निवडणुकीच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागून होते. ६ नोव्हेंबर आणि ११ नोव्हेंबर अशा दोन टप्प्यात बिहार विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडले. तर शुक्रवारी या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालानुसार एनडीए म्हणजेच भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने २०० पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसच्या महाआघाडीला फक्त ३० जागा मिळवता आल्या आहेत.
बिहार निवडणुकीत भाजपने संपादित केलेल्या अभूतपूर्व यशामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर वसई विरार शहरातही फटाक्यांची आतिषबाजी करून आणि एकमेकांना मिठाई भरवत भाजप कार्यकर्त्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी बिहार निवडणुकीत मिळालेल्या यशाचा उत्साह साजरा केला आहे. तसेच यावेळी “बिहार तो झाकी है, वसई विरार अभी बाकी है…” अशा जोरदार घोषणा देखील भाजप कार्यकर्त्यांनी दिल्या. बिहार निवडणुकीत एकीकडे भाजपला मिळालेल्या अभूतपूर्व यशाचा उत्सव साजरा होत असताना. दुसरीकडे येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसई विरारच्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये पण जल्लोष संचारला आहे.
महापालिका निवडणुकांसाठी भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली असताना, शुक्रवारी विरार येथे पहिल्यांदाच वनमंत्री तथा पालकमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरातील स्थानिक प्रश्नांबरोबरच त्यांनी बिहार निवडणुकी संदर्भात देखील माध्यमांना प्रतिक्रिया दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने बिहारमध्ये तिप्पट मतं मिळवत २०० पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रातही असे चित्र असणार असल्याची प्रतिक्रिया गणेश नाईक यांनी दिल्यामुळे असे वसई विरारमध्ये महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे.
जनतादरबार च्या ठिकाणी भाजपने केलेल्या जल्लोषात भाजप नेते गणेश नाईक, नालासोपारा विधानसभेचे आमदार राजन नाईक, वसई विधानसभेच्या आमदार स्नेहा दुबे पंडित, भाजपच्या जिल्हाध्यक्षा प्रज्ञा पाटील आणि भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते सामील झाले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या
निवडणुकीसाठी सेना-भाजप एकत्रच लढणार – नाईक
यावेळी बोलताना भाजप नेते गणेश नाईक यांनी पालघरमध्ये पार पडणाऱ्या नगरपंचायत, जिल्हा परिषद तसेच महापालिका निवडणुकांबाबतचे चित्र स्पष्ट केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) एकत्रितपणे महायुती म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.
