BJP targets Pratap Sarnaik: मिरा भाईंदर महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पहिल्याच महासभेत शिवसेना नेते तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना लोकप्रतिनिधींनी लक्ष्य केल्याचे दिसून आले. सरनाईक यांच्यावर विनाकारण कोट्यवधी रुपये खर्च केल्याचे आरोप करत त्यांच्या मंजूर विकासकामांना कात्री लावण्याचा ठराव महासभेत मंजूर करण्यात आला.

मिरा भाईंदर महापालिकेत मागील साडेतीन वर्षे प्रशासकीय राजवट होती. नुकत्याच निवडणुका पूर्ण झाल्यानंतर नवनिर्वाचित महापौर डिंपल मेहता यांनी बुधवारी पहिल्या महासभेचे आयोजन केले होते. या महासभेच्या विषयपत्रिकेत सुमारे २१ विषयांचा समावेश करण्यात आला होता. दरम्यान, महापालिकेच्या मंजूर विकास योजनेतील आरक्षणांवर सुरू असलेल्या विकासकामांची माहिती सभागृहाला देण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. ही कामे प्रामुख्याने मंत्री प्रताप सरनाईक यांनी मागील काही वर्षांत शासनाकडून मंजूर करून आणली होती.

या विषयावर चर्चा सुरू असताना भाजप नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. यात बाळासाहेब ठाकरे कलादालन, चेना नदी रिव्हर फ्रंट, विविध समाज भवनांचे नामकरण, कचरा प्रकल्प आदी कामांचा समावेश होता. शहरात निधीची कमतरता असताना मंत्री प्रताप सरनाईक यांनी विनाकारण कोट्यवधी रुपयांचा खर्च केल्याचा आरोप भाजप नगरसेवकांनी केला. काही कामांसाठी अतिरिक्त निधी वापरण्यात आल्यामुळे भ्रष्टाचार झाल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला. त्यामुळे सदर कामे रद्द करून आतापर्यंत झालेल्या कामांची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली.यावर ही कामे शासन निधीतून करण्यात येत असून ती नियमांच्या अधीन असल्याचे स्पष्टीकरण शहर अभियंता दीपक खांबित यांनी सभागृहात दिले. त्यानंतर झालेल्या चर्चेनंतर आधीच सुरू असलेल्या कामांची चौकशी करण्याचा तसेच अद्याप सुरू न झालेली कामे रद्द करण्याचा ठराव भाजपकडून मंजूर करण्यात आला.तर या संदर्भात मंत्री प्रताप सरनाईक यांची देखील प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

हजारो झाडांची कत्तल

घोडबंदर येथील चेना गावात मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मागणीनुसार चेना नदी रिव्हर फ्रंटचे काम सुरू आहे. याच ठिकाणी वर्षभरापूर्वी हजारो झाडांची कत्तल करण्यात आल्याचा आरोप आहे. धक्कादायक बाब म्हणजे याबाबत संबंधित विकासकानेच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून झाडांची कत्तल झाल्याची माहिती दिली होती. त्यामुळे झाडतोड प्रकरणाची तसेच तेथील विकासकामांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी भाजप गटनेते हसमुख गेहलोत यांनी केली आहे.

कोट :-

“मागील तीन वर्षात मिरा भाईंदर च्या विकासासाठी शासनाने कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.त्यानुसार प्रत्यक्ष विकास कामे सुरु होऊन पूर्ण होण्याच्या मार्गांवर आली आहे. हा विकास काहींचे डोळे फिरवणारा आहे. त्यामुळे यास रोखण्याचा काही जण प्रयत्न करत आहेत.मात्र महापालिकेने ठराव केले तरी राज्य शासनाला आपले अधिकार आहेत. त्यामुळे विकासाच्या दुष्टीने जे महत्वाचे आहे तेच झाले पाहिजे, अशी आमची भूमिका आहे.”

प्रताप सरनाईक – परिवहन मंत्री