भाईंदर : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विरोधात भाईंदरमध्ये भाजपने पुकारलेल्या आंदोलनाला शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी भेट देत आरसा आंदोलन केले. यावेळी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने परिस्थिती चिघळली. त्यामुळे पोलिसांनी शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले.

मिरा भाईंदर शहरात भाजप आणि शिवसेनेतील वाद दिवसेंदिवस वाढत आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यात एकमेकांवर वैयक्तिक टीका सुरू आहे. नुकत्याच झालेल्या महासभेत भाजप नगरसेवकांनी नागरिक आणि पत्रकारांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ शिवसेनेने शहरातील विविध प्रभागांत भाजप नगरसेवकांविरोधात आंदोलने केली होती. या आंदोलनांमध्ये प्रामुख्याने भाजप आमदार नरेंद्र मेहता यांना लक्ष्य करण्यात आले होते.

या आंदोलनांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने सोमवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विरोधात आंदोलन पुकारले. या वेळी सरनाईक यांच्यावर कथित भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. या आंदोलनस्थळी भाजप आमदार नरेंद्र मेहता हेदेखील भेट देणार होते. दरम्यान, भाजप कार्यकर्ते आंदोलनस्थळी जमले असतानाच शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी तेथे भेट दिली. त्यांच्या हातात आरसे होते.

ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्यांनी सरनाईक यांच्यावर आरोप करण्यापूर्वी स्वतःचा चेहरा आरशात पाहावा, असा संदेश या आंदोलनातून देण्यात येत असल्याचे महिला पदाधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने तणाव निर्माण झाला. परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले.