वसई: फिलीपाईन्स देशात अपघातात मृत्यू झालेल्या परेरा दांपत्याचे पार्थिव दहा दिवसांनंतर वसईत आणण्यात आले. मंगळवारी सकाळी ८.३० वाजता सेंट थॉमस चर्च येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जेरॉल्ड आणि प्रिया हे दांपत्य वसई पश्चिमेच्या सांडोर गावात रहात होते. मे महिन्याची सुट्टी लागल्याने ते फिलीपिन्समधील सेबू येथे सहलीसाठी गेले होते. १० मे रोजी त्यांचा भीषण रस्ता अपघातात मृत्यू झाला होता.
मृत्यूपूर्वी जखमी अवस्थेत असताना जेरॉल्ड यांनी वसईच्या माणिकपूर चर्च मधील धर्मगुरू फादर रेमंड रुमाव यांना फोन केला आणि अपघाताची माहिती दिल्याने त्यांच्या अपघाताचे वृत्त कुटुंबिय आणि इतर नातेवाईकांपर्यंत पोहचले होते. मात्र या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याने सांडोर गावावर शोककळा पसरली होती.त्यांच्या मागे मुलगा तनिष आणि मुलगी त्रिशा असा परिवार आहे.
त्या दोघांचे पार्थिव फिलिपाईन्स येथून वसईत आणण्यासाठी परेरा यांचे नातेवाईक गेले होते.भारतात त्यांचे पार्थिव आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.अनेक कायदेशीर बाबी पुर्ण करुन अखेरीस दोघांचेही पार्थीव मायदेशी आणण्यात आले मंगळवारी सेंट थाॕमस चर्च येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर ख्रिस्ती धर्मानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नातेवाईक व गावकरी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी उपस्थित होते. प्रत्येक देशाचे कायदे वेगळे असतात. मात्र सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून या दोघांचे पार्थिव वसईत आणले असल्याचे चर्चचे धर्मगुरू फादर रेमंड रुमाव यांनी सांगितले आहे.