वसई- अंधेरी येथून बेपत्ता असलेल्या १५ वर्षीय शाळकरी मुलीचा मृतदेह शुक्रवारी दुपारी नायगाव येथे आढळळा आहे. नायगाव पश्चिमेकडील उड्डाणपूलाच्या परिसरात असलेल्या झुडपात हा मृृतदेह एका बॅगेत भरून टाकण्यात आला होता. वालीव पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली असून पोलीस त्याच्या मागावर आहेत.

नायगाव पश्चिमेकडील उड्डाणपूलाच्या खाली शुक्रवारी दुपारी एक प्रवासी बॅग (ट्रॅव्हल बॅग) आढळून आली. स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी बॅगेची तपासणी केली. या बॅगेत चादरीमध्ये एका  १५ वर्षीय मुलीचा मृतदेह गुंडाळून टाकण्यात आला होता. तिच्या पोटावर धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या करण्यात आली होती. वालीव पोलिसांनी या मुलीची ओळख पटवली असून ती अंधेरी येथे राहणारी आहे. ही मुलगी दररोज दुपारी रिक्षाने पावणेबारा वाजता विलेपार्ले येथील शाळेत जाते आणि संध्याकाळी साडेसहा वाजता घरी येते. काल संध्याकाळी ती घरी न आल्याने तिच्या बहिणीने शाळेत चौकशी केली तेव्हा ती शाळेतच आली नसल्याचे समजले. त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी रात्री अंधेरी पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. त्या तक्रारीवरून अंधेरी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तिचा शोध सुरू केला होता.

..मारेकऱ्याने ट्रेनमध्ये आणला मृतदेह

ट्रॅव्हल बॅग मध्ये मृतदेह आढळल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासून आरोपीची ओळख पटवली आहे. आरोपी लोकल ट्रेनमधून उतरून या ठिकाणी आल्याचे सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे. आम्ही आरोपीची ओळख पटवली असून लवकरच त्याला अटक करू अशी माहिती वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांनी दिली.