वसई : वैद्यकीय पदवी नसताना रुग्णालय चालविणारा बोगस डॉक्टर दीपक पांडे याला वसई सत्र न्यायालयाने ३० मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पांडे ५ महिन्यांपासून फरार होता. त्याला तुळींज पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक करून शुक्रवारी वसई सत्र न्यायालयात हजर केले होते.
वसईतील तोतया सुनील वाडकर याच्या हायवे आणि जे नोबेल या रुग्णालयात दीपक पांडे हा बोगस डॉक्टर म्हणून काम करत होता. तो केवळ १२ वी उत्तीर्ण होता. सुनील वाडकरबरोबर तो डॉक्टर म्हणून रुग्णांवर उपचार करत होता. करोनाकाळात त्यांनी केलेल्या उपचारामुळे दोन रुग्णांना जीव गमवावा लागला होता. याप्रकरणी सुनील वाडकर आणि त्याचा साथीदार दीपक पांडे याच्यावरदेखील गुन्हा दाखल करण्यात आला होता. पांडे हा मागील ५ महिन्यांपासून फरार होता. तुळींज पोलिसांनी त्याला उत्तर प्रदेशातून अटक करून आणले. शुक्रवारी त्याला वसई सत्र न्यायालयात हजर केले असता ३० मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
वाडकरची पत्नी डॉ. आरती हिच्याकडे मनुष्यबळ पुरविण्याचा ठेका होता. त्याद्वारे वाडकर २००७ मध्ये नगर परिषदेत डॉक्टर बनून आला. त्यावेळी ठेकेदाराने कागदपत्रे सादर करणे बंधनकारक होते. तसा करार झाला होता, परंतु पालिकेनेही ती कागदपत्रे तपासली नव्हती. २००९ मध्ये महापालिका स्थापन झाल्यावर वाडकर याला मुख्य वैद्यकीय अधिकारी पद देण्यात आले. तत्कालीन आयुक्त किशोर बोर्डे यांच्या सहीने त्याला हे पद देण्यात आले. त्यामुळे किशोर बोर्डे यांचा जबाब नोंदवणे आवश्यक होते. मात्र ५ महिने उलटले तरी अद्याप त्यांचा जबाब नोंदविण्यात आला नाही. हायवे रुग्णालयाला प्रसूती केंद्र म्हणून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने परवानगी कुठल्या आधारावर दिली त्याचीदेखील पोलिसांनी चौकशी केलेली नाही. वाडकर याच्या हायवे रुग्णालयातून किती लोकांना मृत्यू प्रमाणपत्र दिले? त्याच्याकडे बंदी असलेली औषधे का होती? त्याने किती लोकांना आरोग्य विमा (मेडिक्लेम) काढून दिला? याची चौकशीदेखील अद्याप झालेली नाही.
सुनील वाडकर याला १३ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली तेव्हा त्याच्याकडे असलेला आयफोन गायब करण्यात आला. त्याच्या हायवे रुग्णालयातील सर्व कागदपत्रे, दस्तावेज, सीसीटीव्ही डीव्हीआर, मृत्यू नोंदणी रजिस्टर गायब करण्यात आले. ते गायब करण्यामागे सुनील वाडकरची पत्नी आरती वाडकरचा हात आहे, असा आरोप या प्रकरणातील पीडित फिर्यादीने केला आहे.
बोगस डॉक्टर प्रकरणातील अनेक प्रश्न अनुत्तरित
तोतया सुनील वाडकर याला वसई विरार महापालिकेत मुख्य वैद्यकीय अधिकारी बनविणाऱ्या तत्कालीन पालिका आयुक्त तसेच हायवे रुग्णालयाला परवानगी देणाऱ्या जिल्हा परिषदेच्या आरमेग्य अधिकाऱ्यांची अद्याप चौकशी करण्यात आलेली नाही. ठकसेन सुनील वाडकर हा वसई विरार महापालिकेत ६ वर्षे आणि शहरात एकूण १४ वर्षे डॉक्टर बनून वावरत होता. त्याची शहरात दोन खासगी अनधिकृत रुग्णालये होती. १३ डिसेंबर २०२१ रोजी त्याला अटक करम्ण्यात आली होती. या प्रकरणी तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.