बोईसर पोलीस ठाणे हद्दीतील वाळवे बस स्टॉप येथे झालेल्या गोळीबार प्रकरणातील फरार आरोपीला यवतमाळ जिल्ह्यातून अटक करण्यात बोईसर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला यश आले. बोईसर जवळील बेटेगाव येथे चिकन भुजिंग चे दुकान चालविणाऱ्या उमेश मोतीराम घरत याचा त्याच्याकडे काम करणारी महिला आणि फिर्यादी प्रितेश सुरेश वरखंडे यांचा प्रेम संबंधाला विरोध होता. मात्र या दोघांनी विरोधाला न जुमानता मुरबे येथील मंदिरात प्रेम विवाह केला.

याच रागातून आरोपी उमेश घरत याने २३ फेब्रुवारी रोजी पहाटे दोन वाजताच्या सुमारास बेटेगाव महागाव रस्त्यावरील वाळवे बस स्टॉप येथील घरात घुसून प्रितेश वरखंडे यांचे वडील सुरेश राजा वरखंडे यांच्या डोक्याच्या मागच्या बाजूस पिस्तुलातून गोळी झाडून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तर प्रितेश आणि त्याची पत्नी यांना मारहाण करून त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकण्याचा प्रयत्न करून पसार झाला. गोळीबाराच्या घटनेत सुरेश वरखंडे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना बेटेगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व फरार आरोपीला पकडण्यासाठी मार्गदर्शन केले. पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांचे नेतृत्वाखाली बोईसर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक चंद्रकांत हाके, पोलीस हवालदार विजय दुबळा, जयराम चौधरी, योगेश गावित, गणेश वस्कोटी, मयूर पाटील, धीरज साळुंखे, देवेंद्र पाटील, मच्छिंद्र घुगे, शुभम सपकाळे, सचिन सोनवणे यांचे पथक तयार करून आरोपीच्या शोधार्थ रवाना करण्यात आले.

गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने गोपनीय माहिती, सीसीटीव्ही चित्रीकरण आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे एक मार्च रोजी यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड जवळील महामार्गावरून ताब्यात घेत अटक करण्यात आली. आरोपी उमेश घरात याच्या विरोधात भारतीय दंड संहिता २०२३ चे कलम १०९,३३१(६),११५(२),३५२,३५२(२) सह अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायदा, शस्त्र अधिनियम अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक हे करीत आहेत.

आरोपीचा मित्राच्या ट्रक मधून मुंबई ते यवतमाळ प्रवास :

सुरेश वरखंडे यांच्यावर गोळीबार करून आरोपी उमेश घरत हा दुचाकीवरून मुंबई अहमदाबाद महामार्गावरील आवढाणी येथील सती माता हॉटेलमध्ये पोचला. त्यानंतर खाजगी बसने मुंबईत जाऊन तेथे मित्राच्या ट्रक मधून पुणे, सोलापूर, नांदेड मार्गे यवतमाळ येथे पोहोचला. मात्र बोईसर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने बोईसर ते यवतमाळ पर्यंत सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे अत्यंत कौशल्याने आरोपी पळून गेलेला ट्रकचा यशस्वी माग काढत महामार्ग पोलिसांचे सहाय्य घेत उमरखेड तालुक्यातील भोसा- कोसदनी येथून आरोपीच्या मुसक्या आवळल्या.