भाईंदर: मुंबईतील सर्वाधिक वर्दळीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक असलेल्या बोरीवली रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलाला खालच्या बाजूने तडे गेल्याचे समोर आले आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, प्रवाशांकडून संभाव्य दुर्घटनेची भीती व्यक्त केली जात आहे.
बोरीवली रेल्वे जंक्शनवरून दररोज मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे गेल्या काही वर्षांत रेल्वे प्रशासनाकडून स्थानकाच्या आधुनिकीकरणावर भर देण्यात आला आहे. यामध्ये नवीन फलाट, सरकते जिने, पादचारी पूल, तिकीटघर, उद्वाहिका तसेच इतर आधुनिक सुविधांचा समावेश आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. मात्र, नवीन सुविधांची उभारणी करताना जुन्या संरचनांच्या देखभाल व दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची बाब समोर आली आहे.
स्थानकाच्या मध्यभागी उभारण्यात आलेल्या पादचारी पुलाला खालच्या बाजूने तडे गेल्याचा व्हिडिओ एका प्रवाशाने सोशल मीडियावर प्रसारित केला आहे. व्हिडिओमध्ये दिसणारे तडे मोठे असल्याचा दावा करण्यात येत असून, त्यामुळे संबंधित भाग अथवा पूल कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अशी कोणतीही दुर्घटना घडल्यास मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होऊ शकते, अशी चिंता प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.
त्यामुळे रेल्वे प्रशासनाने तात्काळ या प्रकरणाची दखल घेऊन पुलाची तपासणी व आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, या व्हायरल व्हिडिओबाबत रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळू शकला नाही.
रेल्वेची प्रतिक्रिया :
“समाज माध्यमांवर प्रसारित होत असलेल्या व्हिडिओमध्ये बोरीवली स्थानकावरील पादचारी पुलाच्या स्लॅबला तडे गेल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र संबंधित पुलाची रेल्वेच्या तांत्रिक अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली असून संरचनेत कोणतेही तडे आढळून आलेले नाहीत. सदर पूल संरचनात्मकदृष्ट्या सुरक्षित असून प्रवाशांच्या वापरासाठी योग्य आहे. नागरिकांनी अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये तसेच अधिकृत स्रोतांकडूनच माहिती घ्यावी,” असे स्पष्टीकरण पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिले आहे.
