लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

वसई : वसई पूर्वेच्या एव्हरशाईन सिटी येथे राहणार्‍या भावा बहिणीने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. कर्जबाजारीपणामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे आचोळे पोलिसांनी सांगितले.

हनुमंता प्रसाद (४०) आणि त्यांची बहिण यमुना प्रसाद (४५) हे वसई पूर्वेच्या एव्हरशाईन सिटी येथील मंगल वंदन सोसायटीत रहात होते. दोघेही अविवाहित होते. हनुमंता मुंबईतील खासगी कंपनीत कामाला होता. त्यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी आचोळे पोलिसांना दिली.

पोलिसांनी दार उघडून आत प्रवेश केला असता बेडरूम मध्ये दोघांचे मृतदेह आढळले. किमान ४ ते ५ दिवसांपूर्वी त्यांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. याप्रकरणी आचोळे पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Story img Loader