वसई – वसई पश्चिमेच्या एका सोसायटीमध्ये चार वर्षीय मुलाला अमानुष मारहाण झाल्याचा प्रकार घडला. या मुलाला विचित्र पद्धतीने मारहाण करण्यात आली. या प्रकाराबाबत स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधी तीव्र संताप व्यक्त करीत मारहाण करणाऱ्या व्यक्तिवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

३० मार्चला वसई पश्चिमेच्या भागात अनुपम संकुल सोसायटीत अतुल कोंढारे यांच्या चार वर्षीय मुलगा विघ्नेश याला सोसायटीत राहणाऱ्या संदीप पवार याने त्याचे डोके रिक्षांवर आपटून दिले. याशिवाय त्यामुलाला उचलून डोक्यावर आपटत अमानुष मारहाण केली होती. यात विघ्नेश गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या मारहाणीच्या घटनेची सीसीटीव्ही चित्रफीत सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण वसई विरार शहर हादरून गेले आहे. एका चार वर्षीय निष्पाप मुलाला अशा क्रूर पणे मारहाण झाल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

याबाबत वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी सुद्धा रुग्णालयात जाऊन जखमी मुलाची व त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली. याबाबत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी सदरची घटना अत्यंत गंभीर व मानवतेला काळिमा फासणारी घटना असल्याचे नमूद करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

वसई विरार शहराचे महापौर अजीव पाटील यांनी सुध्दा या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. अशा घटना फास्ट ट्रॅकवर घेऊन यातील दोषी आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे असे त्यांनी सांगितले आहे. सद्यस्थितीत आरोपीला वसई पोलिसांनी अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे असे सांगण्यात येत आहे.