वसई:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामांना चांगलीच गती मिळाली असून महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वैतरणा नदीवर उभारण्यात येणाऱ्या पुलाचे काम प्रगतीपथावर आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडियावर या पुलाच्या बांधकामाचा व्हिडिओ शेअर केला असून, प्रकल्पाचे काम मोठ्या प्रमाणात पूर्ण झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प वसई विरार व पालघर जिल्ह्याच्या भागातून जात आहे.  या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या संदर्भातील भूसंपादन, बोगदे, खांब उभारणी, नदीवर पूल तयार करणे अशी विविध प्रकारची कामे वेगाने सुरू आहेत.

विरार जवळील वैतरणा नदीवर ही बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी २.३२ किलोमीटर लांबीचा पूल उभारणीचे काम सुरू आहे.

​वैतरणा नदीवर उभारण्यात येत असलेला हा पूल प्रकल्पातील सर्वात आव्हानात्मक कामांपैकी एक मानला जातो. या पुलाची लांबी आणि नदीपात्रातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून खांबांची उभारणी करण्यात आली आहे. नुकताच याबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करीत या पुलाची माहिती दिली आहे.

रेल्वे मंत्र्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पुलाची भव्यता आणि त्यावर सुरू असलेले फिनिशिंगचे काम स्पष्टपणे दिसत आहे. जवळपास हा पूल २.३२ किलोमीटर लांबीचा असून यासाठी सुमारे ५८ खांब(Piers) उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात असून या प्रकल्पातील हा सर्वात मोठा पूल साकारला जात असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.