मोफत सेवेचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

वसई : दिवाळीच्या सुट्टीनंतर शाळांना प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याने वसई-विरार महापालिकेने विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा सुरू केली आहे. शुक्रवारी नालासोपारा या मोफत बससेवेचा शुभारंभ झाला. या मोफत बससेवेमुळे ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

वसई-विरार महापालिकेने शहरातील मराठी, हिंदूी, उर्दू अनुदानित शाळांसाठी मोफत बस योजना सुरू केली होती. २०१६ पासून तत्कालीन महापौर प्रवीणा ठाकूर यांच्या संकल्पनेतून ही बससेवा सुरू होती. पालिकेच्या ५५ अनुदानित शाळांतील साडेआठ हजार विद्यार्थी या मोफत बससेवा योजनेचा लाभ घेत होते. मार्च २०२० मध्ये करोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर शाळा बंद झाल्या. परिणामी मोफत बससेवा योजनादेखील बंद करण्यात आली होती. करोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर शालेय शिक्षण विभागाने ८ वी ते १० वीच्या शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. दिवाळी सुट्टीनंतर इतर वर्गही सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी महापालिकेच्या परिवहन विभागाने बंद झालेली मोफत बस योजना पुन्हा सुरू केली आहे.

सध्या चार शाळांनी आतापर्यंत पालिकेकडे अर्ज केले आहेत. त्यानुसार ५७८ विद्यार्थ्यांसाठी शुक्रवारपासून बससेवा सुरू करण्यात आली. तुळींज येथे सकाळी पहिल्या बसला हिरवा झेंडा दाखवून शुभांरभ करण्यात आला. विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापासून घेऊन शाळेत सोडले आणि शाळेतून घरी आणले जाणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या योजनेचा मोठा लाभ होणार आहे.

वाढता शैक्षणिक खर्च, वाढलेले शुल्क यामुळे पालकांना मोठा आर्थिक भार पडत होता. या बससेवेमुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, असे माजी सभापती नीलेश देशमुख यांनी सांगितले. यासाठी महापालिकेने साडेतीन कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. पालिकेच्या महिला बाल विकास समितीमार्फत ही योजना राबविण्यात येत आहे. टप्प्याटप्प्याने मागणीनुसार बसगाडय़ांची संख्या वाढविण्यात येईल, अशी माहिती परिवहन सभापती प्रीतेश पाटील यांनी दिली.