वसई: विरारमधील रेल्वे फाटकाजवळ होणारी वाहतूक कोंडी फुटावी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नारिंगी उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. पण, गेली चार ते पाच वर्षे रखडलेल्या या पुलावरून बहुजन विकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये श्रेयवाद सुरू झाला आहे.

वसई विरार शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. वाढत्या नागरिकरणा दृष्टीने शहरातील विविध रस्ते व उड्डाणपूल तयार करून दळणवळण सुलभ करण्यावर भर दिला जात आहे. याच पार्श्वभूमीवर विरार जवळील नारिंगी येथे विरार पूर्व व पश्चिम जोडता यावे यासाठी उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नारिंगी उड्डाणपूल तयार करण्याचे काम सुरू आहे. हा पूल ७२५ मीटर लांबीचा असून १४ मीटर रुंद आहे. यासाठी २४ कोटी रुपये खर्च केले जात आहेत. तर डिसेंबर २०२५ मध्ये पुलाचे काम पूर्ण केले जाईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली होती. मात्र वर्ष उलटून गेल्यानंतरही पुलाचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही.

उड्डाणपुलाचे काम पूर्ण होत नसल्याने त्याचा थेट फटका नागरिकांना बसत आहे. तर दुसरीकडे पुलाचे काम पूर्ण होण्याआधीच बहुजन विकास आघाडी आणि भाजपमध्ये या पुलावरून श्रेयवाद सुरू झाला आहे. गुरुवारी, नालासोपाऱ्याचे आमदार राजन नाईक यांनी यांनी कार्यकर्त्यांसह पाहणी केली. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, रेल्वे प्रशासन व वसई–विरार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष स्थळी जाऊन जाब विचारतानाची त्यांची एक चित्रफितही समाजमाध्यमांवर व्हायरल झाली होती.

तर दुसरीकडे त्याचदिवशी नारिंगी येथील रेल्वे लवकरात लवकर सुरु करण्यात बाबत रेल्वे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, महापालिका कर्मचारी, वीज विभागाचे अधिकारी आणि ठेकेदारांची बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक प्रफूल साने, अजीव पाटील, मार्शल लोपीस यांनीही बैठक घेऊन चर्चा केली होती.

विरार नारिंगी उड्डाणपूल का आहे महत्त्वाचा?

विरार पूर्व पश्चिम अशी वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे विरारच्या उड्डाणपुलावर कोंडी निर्माण होते. याशिवाय विरार पूर्वेच्या साईनाथ नाका येथे ही मोठ्या प्रमाणात वाहनांची कोंडी होते. जर नारिंगी पूल झाला तर बहुतांश वाहने ही त्या मार्गावरून जातील त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या नियंत्रणात येईल.