वसई :  वसई-विरार शहरात प्लास्टिकचा बेसुमार वापर होऊ लागला आहे. या वापरावर निर्बंध घालण्यासाठी पुन्हा एकदा पालिकेने मोहीम सुरू केली आहे. ७५ मायक्रोन्स पेक्षा कमी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर कारवाई करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे.

प्लास्टिकच्या अतिवापरामुळे त्याचा मोठा परिणाम हा पर्यावरणावर होऊ लागला आहे. याआधी राज्य शासनाने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेऊन ५० मायक्रोन्स पेक्षा कमी असलेल्या प्लास्टिकचे उत्पादन, वापर, साठवणूक करणाऱ्यावर बंदी घातली होती. त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश महापालिका व महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना देण्यात आले होते. त्यानुसार पालिकेने सुरुवातीला शहरातील कंपन्यासह दुकानावर छापे टाकून मोठय़ा प्रमाणात प्लास्टिक जप्त करून कारवाई केली होती. तर प्लास्टिक निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना टाळे ठोकले होते.

आता पुन्हा एकदा पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन, मंत्रालय यांच्या नियम व अधिसूचनेनुसार ७५ मायक्रोन्सपेक्षा कमी असलेले एकदाच वापर होणाऱ्या प्लॅस्टिक पिशव्या, भांडी व थर्मोकॉल अविघटनशील वस्तू वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यानुसार त्याची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेशही पालिकेला दिले आहेत. त्याच अनुषंगाने वसई-विरार महापालिकेनेही प्लास्टीक बंदी विरोधी मोहीम अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. यात ७५ मायक्रोन्सपेक्षा कमी असलेल्या प्लास्टिकच्या वापरकर्त्यांंच्या विरोधात कारवाई केली जाणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.यात दुकाने व आस्थपना, फेरीवाले, बाजारपेठा अशा विविध ठिकाणी तपासणी केली जाणार आहे. ज्या ठिकाणी प्लास्टिकचा वापर आढळून येईल, अशा विरोधात दंडात्मक कारवाई केली जाईल असे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी निलेश जाधव यांनी सांगितले आहे.

छुप्या मार्गाने वापर होणाऱ्या प्लास्टिकचे काय?

वसई विरार महापालिकेने प्लास्टिकची निर्मिती करणाऱ्या कारखान्यांना टाळे ठोकले होते. त्यासोबतच प्लास्टिकचा वापर करणाऱ्यावर कारवाई केली होती. तरी सुद्धा काही केल्या प्लास्टिकचा वापर कमी झाला नाही. पालिकेच्या दैनंदिन गोळा केलेल्या कचऱ्यात ही प्लास्टिक पिशव्यांचे प्रमाण अधिक असल्याचे चित्र दिसून येत आहे.शहरात प्लास्टिक बंदी असतानाही शहरात छुप्या मार्गाने प्लास्टिक येऊ लागले आहे. अशा प्रकारचे प्लास्टिकच्या पिशव्या शहरात आणून बेकायदा मार्गाने विकल्या जात आहेत.या छोटे दुकानदार, किरकोळ विक्रेते, फेरीवाले व इतर मालविक्रेते यांना पुरविल्या जात आहेत याकडे मात्र पालिकेचे दुर्लक्ष झाले असल्याने बंदी असूनही प्लास्टिकचा वापर सुरूच आहे अशा प्लास्टिकचे काय असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला आहे.

शहरात प्लास्टिक विरोधात कारवाई करण्यासाठी पालिकेची या आधीची पथके पुन्हा सक्रिय केली आहेत. यात ७५ मायक्रोन्सपेक्षा कमी असलेल्या प्लास्टिक वापरावर कारवाई केली जाणार आहे.

निलेश जाधव, घनकचरा व्यवस्थापन अधिकारी महापालिका