वसई- विरारच्या चिखलडोंगरी गावात पुन्हा एकदा जातपंचायतीची दहशत सुरू झाली आहे. गावातील देवेंद्र राऊत यांच्या आजीचा दशक्रिया विधी गावाने उधळून लावला. यावेळी विधी करण्यासाठी आलेल्या गुरूजींच्या मुलीला जातपंचायतीच्या लोकांनी मारहाण करत शिवीगाळ केली. विशेष म्हणजे पोलिसांना याची लेखी सूचना देऊनही उपाययोजना केली नव्हती. महिलेला मारहाण होऊन केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरारच्या चिखलडोंगरी गावात स्वांतत्र्यानंतरही जात पंचायतीची प्रथा सुरू होती. मागील वर्षी ‘लोकसत्ता’ने हे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर तहसीलदार आणि पोलिसांनी ही प्रथा बरखास्त केली. मात्र आता पुन्हा जातपंचायत डोके वर काढू लागली आहे. गावातील एक रहिवाशी देवेंद्र राऊत (४०) यांना त्यांच्या आजीची दशक्रिया विधी करायची होती. मात्र चंद्रकात खरे या गुरूजींच्या हातून विधी करण्यासाठी गावातील एका गटाने विरोध करत दमदाटी केली होती. हा गट पूर्वी जातपंचायतीमध्ये सक्रिय होता. त्याबाबत शनिवार २० जुलै रोजी राऊत यांनी अर्नाळा सागरी पोलिसांना लेखी अर्ज करून जीवितास धोका असल्याचेही सांगितले होते. मात्र रविवारी पोलिसांनी केवळ दोन पोलीस गावात दिले. जातपंचायतीच्या अधिपत्याखाली असेलल्या गटाने विधी उधळून लावला. विधीसाठी आलेले गुरूजी खरे यांची मुलगी दिपा खिरापते (४३) यांना अश्लील शिवीगाळ करत मारहाण केली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर पोलिसांनी अधिक कुमक मागवली. हेही वाचा - नालासोपाऱ्यात पाईप गॅस जोडणी करतांना स्फोट; ४ जण होरपळले केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद तक्रारदार दिपा खिरापते या अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेल्या असत्या त्यांना वीज नसल्याचे कारण देत ३ तास बसवून ठेवले. त्यानंतरही केवळ काही महिलांनी मारहाण केल्याचे नमूद करून केवळ अदखलपात्र गुन्हा (एनसी) दाखल केला. मला पोलिसांसमोर गावातील अनेक पुरुषांनी मारहाण करून अश्लील शिवीगाळ केली तरी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. मला मारहाण होत असताना पोलीस बघत होते असा आरोपही त्यांनी केला. हेही वाचा - माजी नगरसेविकांचे वायरल चित्रफित प्रकरण; आमदार गीता जैन समर्थकांविरोधात गुन्हा दाखल नेमका वाद काय? जात पंचायच गावात नसल्याचे पोलिसांनी सांगितले. पंढरपूर येथील मठाच्या मालकीवरून गावातील लोकं आणि विश्वसांमध्ये वाद आहे. त्यामुळे मठाच्या गुरूजींना गावात बंदी आहे. या वादामुळे हा प्रकार घडला आहे. गावातील गटाच्या दहशतीमुळे देवेंद्र राऊत हे भूमिगत झाले आहेत.