विरार : वसई विरारमधील तलाठी कार्यालयातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी तत्कालीन तहसीलदारांच्या आदेशानुसार लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे त्यांची बदली होताच गायब झाले आहेत.
वसई विरारमधील तलाठी कार्यालयात मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप होत असल्याने वसईचे तत्कालीन तहसीलदार सुनील कोळी यांनी सन २०१५ मध्ये लेखी आदेश काढत तलाठी कार्यालयात सीसीटीव्ही बसविण्याचे आदेश दिले होते. मात्र आदेश देवूनही केवळ विरार, मांडवी आणि माणिकपूर तलाठी कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. यातही तलाठी कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांनी शक्कल लढवत हे सीसीटीव्ही कॅमेरे उलटे म्हणजे छताच्या दिशेने फिरवले होते. त्यानंतर तीन तहसिलदार आले. परंतु त्यातील कुणीच यावर आक्षेप घेतला नाही, त्यामुळेच की काय, संबंधित अधिकाऱ्यांचा विश्वास बळावला आणि आता चक्क सीसीटीव्ही कॅमेरेच गायब झाले आहेत.
विरार येथील तलाठी कार्यालयात या कॅमेऱ्यांचे तोंड छताच्या दिशेला असून त्याची तार कापून ठेवली आहे. अनेक कार्यालयांतील कॅमेऱ्यांचे सीडीआर गायब आहेत. तर वसई आणि मणिकपूर येथेही हीच स्थिती आहे. इतर तलाठी कार्यालयांनी तर हे कॅमेरेच बसवलेले नाहीत.
वसईत एकूण ३८ तलाठी कार्यालये आहेत. त्यांचा कारभार पारदर्शकपणे चालण्यासाठी ही यंत्रणा राबवण्यात तत्कालीन प्रांत अधिकारी दादा दातकर यांनी पुढाकार घेतला होता. पण यानंतरच्या कोणत्याही तहसीलदार वा प्रांत अधिकाऱ्याने त्यात रस दाखवला नाही.
तलाठी कार्यालयात सर्वाधिक जमिनीची कामे होतात. जमिनीचे सातबारे, फेरफार, गावनमुना, विविध दाखल्यांसाठी दररोज हजारो नागरिक येथे येतात. अनेकदा तलाठी, कर्मचारी जागेवर नसतात. दलाल गरीब नागरिकांना फसवतात या सगळय़ा प्रकारांना सीसीटीव्हीमुळे आळा बसू शकतो. परंतु तलाठी कार्यालयांनी या कॅमेऱ्यांनाच हद्दपार केले आहे.
यासंदर्भात तहसीलदार उज्वला भगत यांना विचारणा केली असता यासंदर्भात कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच माहिती घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल असेही आश्वासन दिले.