भाईंदर : मीरा-भाईंदर शहरात सिमेंटचे रस्ते उभारण्यासाठी ५०० कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. बँक ऑफ बडोदाकडून हे कर्ज पालिकेला मिळणार आहे. मीरा-भाईंदर शहरात मोठय़ा प्रमाणात विविध विकास कामे सुरू आहे. शहरातील रस्ते उत्तम आणि दीर्घकाळ टिकावे यासाठी शहरातील रस्ते सिमेंटचे बनविण्याचा निर्धार पालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी व्यक्त केला होता. त्यासाठी शहराच्या रस्त्यांचे सर्वेक्षण करून ६७ ठिकाणी सीमेंटचे रस्ते तयार केले जाणार आहेत. यासाठी सुमारे एक हजार ३४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मात्र एवढा मोठा खर्च पालिकेला करता येणे शक्य नसल्याने खासगी बँकेतून कर्ज घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
नियमानुसार पालिका प्रशासनाला खासगी कर्ज घेण्यापूर्वी राज्य शासनाची परवानगी घेणे बंधनकारक असते. त्यामुळे हे कर्ज घेण्याची परवानगी मिळावी म्हणून पालिकेने राज्य शासनाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रथम टप्प्यात केवळ पाचशे कोटींचे कर्ज घेण्याचे परवानगी पालिकेला दिली आहे. बँक ऑफ बडोदामधून हे कर्ज पालिकेला मिळणार आहे. कर्जाचा परतावा १० ते ६० वर्ष या कालावधीत करायचा आहे. कमीत कमी व्याजदरात हे कर्ज मिळावे यासाठी पालिकेकडून बँकेबरोबर वाटाघाटी सुरू आहेत. औपचारिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे ५०० कोटी रुपयांचे कर्ज पालिकेला मिळणार आहे.