scorecardresearch

प्रशासक नेमणुकीला आव्हान

वसईतील संत जोसेफ पतपेढीवर दुय्यम निबंधकांनी चौथ्यांदा प्रशासक नेमला आहे.

सूडबुद्धीने कारवाई केल्याचा संत जोसेफ पतपेढीच्या संचालकांचा दावा

वसई: वसईतील संत जोसेफ पतपेढीवर दुय्यम निबंधकांनी चौथ्यांदा प्रशासक नेमला आहे. मात्र ही कारवाई सूडबुद्धीने झाल्याचे सांगत संचालक मंडळाने उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. वसईतील संत जोसेफ पतपेढी ३५ वर्षे जुनी पतपेढी असून तिचे ११ हजारांहून अधिक सभासद आहेत. संचालकांनी निवडणुकीची यादी योग्य पद्धतीने सादर केली नसल्याचा ठपका ठेवत सहनिबंधकांनी संस्थेवर प्रशासकाची नेमणूक केली आहे. मात्र ही कारवाई आकसापोटी केली असल्याचा आरोप संचालकांनी केला आहे. त्याविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. प्रशासकाने ताबा घेण्यापूर्वी लेखी पत्र देणे अपेक्षित असते. संचालकांनी ताबा न दिल्यास पोलिसांतर्फे ताबा घेण्याची प्रक्रिया केली जाते. मात्र आम्हाला पूर्वकल्पना न देता प्रशासकाने ताबा घेतला आहे. त्यामुळे संस्थेचे दप्तर आणि महत्त्वाच्या कागदपत्रात फेरफार होण्याचा धोका असून प्रशासकाविरोधात गुन्हे दाखल करावेह्ण असे सांगत संचालकांनी वसई पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तर संस्थेच्या संदर्भातील कोणतीही प्रकरणे कोकण विभागाच्या सहकारी संस्थेच्या सहनिबंधकांकडे सोपवू नयेत आणि ती आपल्या कार्यकक्षेत घ्यावी अशी मागणी संस्थेचे अध्यक्ष व्हॅलेरियन घोन्साल्विस यांनी केली आहे. कोकण विभागाच्या विभागीय सहनिबंधकांनी कलम ७३ क अ (३) अन्वये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना पदावरून बरखास्त करुन अध्यक्षपदाची निवडणूक लावली होती. याविरोधात अध्यक्षांनी उच्च न्यायालयात पिटिशन दाखल केल्यानंतर न्यायालयाने त्यास स्थगिती दिली होती. तरीही सहनिबंधकांनी निवडणूक लावली होती. मात्र संचालक उपस्थित नसल्याने ती होऊ शकली नव्हती.

यापूर्वी तीनदा प्रशासक

२०१३ मध्ये पहिल्यांदा कलम ८८ अन्वये प्रशासक नेमण्यात आला होता. संचालकांनी त्यास उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. २०१३ ते २०१५ पर्यंत संस्थेवर प्रशासक कार्यरत होता. सहकार मंत्रालयाने सहनिबंधकांचे आदेश रद्द करून संचालकाकडे ताबा दिला होता. त्यांतर कलम ८३ अन्वये चौकशी करण्यात आली होती. मागील दीड वर्षांत तीन वेळा प्रशासक नियुक्त करण्यात आले होते. २०१२ मध्ये संस्थेच्या ठेवी १०५ कोटी रुपयांच्या होत्या. प्रशासक काळात त्या १८ कोटींवर आल्या होत्या. प्रशासक उठवल्यानंतर संचालकांनी ठेवी पुन्हा ३४ कोटींवर आणल्या होत्या. या कारवाईमुळे सभासदामध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Challenge administrator appointment director union claims revenge ysh