scorecardresearch

व्हॉट्सअ‍ॅपवर पोलीस आयुक्तांना भेटण्याची संधी ; पोलीस आयुक्तालयात ‘ई व्हिजिट’ सेवा सुरू

पोलीस आयुक्त सदानंद दाते हे दररोज दुपारी ३ ते ५ या वेळेत सर्वसामान्य नागरिकांना भेटत असायचे.

वसई : करोनाकाळात प्रत्यक्ष भेटींवर नियंत्रण आल्याने आयुक्तांना भेटण्यासाठी मीरा-भईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयात आता ‘ई-व्हिजिट’ सेवा सुरू झाली आहे. नागरिकांनी एका व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर आपला अर्ज पाठवल्यास थेट आयुक्तांना दूरदृश्य प्रणाली (व्हिडीओ कॉन्फरन्सिंग) वर थेट भेटता येणार आहे. या सेवेमुळे नागरिकांचा वेळ वाचणार असून त्यांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण होण्यास मदत होणार आहे.

पोलीस आयुक्त सदानंद दाते हे दररोज दुपारी ३ ते ५ या वेळेत सर्वसामान्य नागरिकांना भेटत असायचे. मात्र करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांच्या प्रत्यक्ष भेटी बंद करण्यात आल्या. यामुळे नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी ई-व्हिजिट सेवा सुरू करण्यात आली आहे. नागरिकांना आपल्या तक्रारीचा अर्ज पोलीस आयुक्तालयाच्याcpoffice.mb-vv@mahapolice.gov.in या ईमेलवर किंवा ८५९१३३६६९८ या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर पाठवायचा. त्यानंतर संबंधित नागरिकांना ई व्हिजिटची वेळ देण्यात येते. यावेळी पोलीस आयुक्त, संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि तक्रारदार एकाच वेळेच दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधतात. यामुळे नागरिकांच्या तक्रारींचे निवारण तात्काळ होत आहे.

राज्य शासनाने दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडीओ कॉन्फरन्सिंग) अधिकाअधिक वापर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने ही सेवा सुरू केली. या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे करोनाकाळातील नियमांचे पालनही होते. नागरिकांचा मुख्यालयात येण्याचा वेळ वाचतो आणि त्यांच्या तक्रारींचे निवारणही होते, असे पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी सांगितले. या ई-व्हिजिट सेवेद्वारे सध्या दररोज ५ ते १० नागरिक संवाद साधत आहेत. भविष्यात देखील सोयीच्या दृष्टिकोनातून या सेवेचा वापर वाढविण्याचा पोलिसांचा विचार आहे. पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी नागरिकांच्या सोयीसाठी ई ऑफिसप्रणाली सेवा सुरू केली होती. त्यानुसार नागरिकांनी पाठवलेले किंवा मेल केलेले अर्ज संगणक प्रणालीवर वरिष्ठांकडे तात्काळ पोहोचतात आणि अवघ्या काही मिनिटांत ते कारवाईसाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवले जातात. यामुळे नागरिकांच्या प्रत्येक तक्रारीची दखल घेतली जात आहे.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chance to meet the vvmb commissioner of police on whatsapp zws

ताज्या बातम्या