रिक्षाचालकांकडून अतिरिक्त भाडे आकारणी सुरूच

करोनाकाळात संसर्गवाढू नये म्हणून रिक्षा वाहतुकीवरसुद्धा निर्बंध आणले होते.

विरार :  वसई-विरार परिसरात  करोनाकाळात प्रवासी संख्या मर्यादित केल्याने भाडेवाढ करण्यात आली होती.  मात्र, आता करोना  रुग्णसंख्या आटोक्यात आल्यानंतर निर्बंध शिथील झाले आहेत. त्यामुळे प्रवासी संख्या वाढली तरी भाडेवाढ मात्र तशीच आहे. यामुळे नागरिकांना अतिरिक्त भाडे देऊन प्रवास करावा लागत आहे. त्यात मर्यादेपेक्षा अधिक प्रवासी बसविल्याने प्रवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

करोनाकाळात संसर्गवाढू नये म्हणून रिक्षा वाहतुकीवरसुद्धा निर्बंध आणले होते. केवळ अत्यावश्यक सेवेसाठी रिक्षांचा वापर केला जात होता, पण जसजसा करोनाचा प्रादुर्भाव कमी होत गेला तसतशी रिक्षा वाहतुकीला परवानगी देण्यात आली. पण फक्त दोनच प्रवासी घेऊन जाण्याची परवानगी दिली होती. यामुळे रिक्षाचालकांचे मोठे आर्थिक नुकसान होत होते. यामुळे रिक्षाचालकांनी आधीच्या भाड्यात दुपटीने वाढ करत भाडेवाढ केली होती. नागरिकांनीसुद्धा केवळ दोन प्रवासी असल्याने ही भाडेवाढ निमूटपणे सहन केली. पण आता करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने रिक्षा वाहतूक बहुतांश ठिकाणी सुरळीत झाली आहे. रिक्षाचालक परवानगी नसतानाही ४ प्रवासी घेऊन वाहतूक करत आहेत. तरीसुद्धा त्यांच्याकडून दुप्पट भाडे घेत आहेत. यामुळे  नागरिकांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. अनेकवेळा रिक्षाचालक भाड्यासाठी प्रवाशांची हुज्जत घालताना दिसतात. यामुळे प्रवासी वाद नको म्हणून मागेल ते भाडे देऊन निघून जातात. 

 करोनाकाळाच्या आधीच्या दरात रिक्षाचालकांनी दुपटीने वाढ केली आहे. जिथे १० रुपये होते तिथे २० झाले, जिथे २० होते तिथे ४०, तर रात्रीच्या वेळी वाट्टेल ते भाडे आकारले जात आहे. यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत. महापालिकेची बससेवा मर्यादित असल्याने नागरिकांना रिक्षावाल्यांच्या भाडेवाढीला बळी पडावे लागत आहे. 

 मागील महिन्यापासून लशींच्या दोन मात्रा पूर्ण केलेल्या नागरिकांना रेल्वेत प्रवाशाची मुभा मिळाल्याने प्रवासी संख्या वाढली आहे. या नागरिकांना प्रवासासाठी रिक्षाचाच वापर करावा लागतो. पण केवळ ठरावीक अंतरासाठीसुद्धा त्यांना अतिरिक्त भाडे द्यावे लागत आहे. जादा भाडे दिले नाही तर रिक्षावाले प्रवाशांची हुज्जत घालत असल्याची तक्रार विरारमधील प्रवासी प्रथमेश पाटील यांनी केली.

या संदर्भात फुलपाडा येथील रिक्षाचालक मालक संघटनेचे पदाधिकारी जितू आकरे यांनी सांगितले की, फुलपाडा रिक्षा स्थानकात आम्ही फलक लावून चार प्रवासी असल्यास केवळ १० रुपये भाडे द्यावे असे आवाहन केले आहे. तर अतिरक्त भाडे आकारण्यावर कारवाई करावी, अशी मागणी वाहतूक पोलिसांना केली आहे. तर वसई वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक शेखर डोंबे यांनी माहिती दिली की, अजूनही किती प्रवासी बसवावे या संदर्भात कोणतेही नवीन आदेश आले नाहीत. यामुळे रिक्षाचालकांनी जुन्या नियमानुसार प्रवासी वाहतूक करणे अपेक्षित आहे. तसेच अतिरिक्त भाडे घेऊन जाणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाईल. सध्या रिक्षात कमीत कमी तीन प्रवासी बसवतात, त्यातही भाडे दुप्पट आकारतात. काही बोलायला गेले तर हुज्जत घालतात. प्रवासी जास्त असतील तर भाडे कमी करावे, प्रवासी महेश मीना यांनी सांगितले.

या संदर्भात अनेक वेळा रिक्षाचालकांना सांगितले आहे की, भाडे कमी करावे, पण वेगवेगळ्या युनियन आणि बेकायदेशीर रिक्षांचा भरणा झाल्याने कुणीही भाडेवाढ कमी करायला तयार नाही. या संदर्भात लवकरच वाहतूक पोलिसांना सांगून कारवाईसाठी सांगितले जाईल. – प्रेमकुमार गुप्ता, अध्यक्ष, रिक्षा चालक-मालक संघटना, विरार

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व वसई विरार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Charge extra fare from rickshaw pullers vasai virar akp