भाईंदर: भाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीत नव्याने बसवण्यात आलेली चिमणी बंद अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. परिणामी अंत्यविधी दरम्यान निघणारा धूर परिसरात पसरून प्रदूषण निर्माण होत असल्याची तक्रार नागरिक करू लागले आहेत.
भाईंदर पश्चिम येथील आंबेडकर झोपडपट्टीजवळ महापालिकेची हिंदू स्मशानभूमी आहे. या परिसरात लोकसंख्या मोठी असल्यामुळे स्मशानभूमीचा वापरही अधिक प्रमाणात होतो. त्यामुळे प्रशासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून येथे आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. येथे एकाच वेळी चार ठिकाणी अंत्यविधी करण्याची सोय असून, यामधून निघणारा धूर अडवण्यासाठी आधुनिक पद्धतीची मोठी चिमणी उभारण्यात आली आहे.
मात्र, सद्यस्थितीत ही चिमणी बंद असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अंत्यविधीच्या वेळी निघणारा धूर थेट परिसरात पसरत आहे. या धुराचे प्रमाण इतके वाढले आहे की परिसरातील रहिवासी त्रस्त झाले आहेत. वाढते प्रदूषण लक्षात घेता राज्य शासनाने महापालिकेला विविध उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रशासनाने काही उपाय योजना राबवल्या असल्या तरी त्याची नियमित देखभाल होत नसल्यामुळे प्रदूषणाची समस्या पुन्हा वाढत आहे, असा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.
याबाबत पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे विचारणा केली असता शहरात स्मशानभूमीवरील चिमण्या सुरूच असतात. जर कुठे चिमण्या बंद असल्याचा प्रकार असेल तर त्याची पाहणी करून दुरूस्त केली जाईल.
देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष
मिरा-भाईंदर शहरातील स्मशानभूमीतील यंत्रणा आणि साहित्याची देखभाल व दुरुस्तीसाठी महापालिकेने खासगी कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. यासाठी लाखो रुपयांचा खर्च केला जात आहे. मात्र, कंत्राटदार नियमित देखरेख करत नसल्यामुळे वेळोवेळी समस्या निर्माण होत आहेत. नुकतेच स्मशानभूमीत कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाल्याचे प्रकार उघडकीस आले होते. आता चिमणी बंद असल्यामुळे नागरिकांत संतापाची लाट पसरली आहे.