First Advent Sunday/ वसई: दिवाळी संपताच वसई विरारमध्ये खासकरून ख्रिस्ती बांधवांकडून सुरुवात होते ती नाताळ सणाच्या तयारीची दरवर्षी डिसेंबर महिन्यात येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण, नाताळ हा सण खऱ्या अर्थाने सुरू होतो तो नाताळ सुरू होण्याआधी येणाऱ्या पहिल्या चार रविवारपासून. चार पवित्र रविवारी वेगवेगळ्या रंगाच्या मेणबत्त्या लावून विधी साजरे केले जातात. त्यानुसार पहिल्या रविवारी ३० नोव्हेंबर रोजी जांभळ्या रंगाची मेणबत्ती लावून नाताळ सणाच्या आगमनाची तयारी सुरु करण्यात आली.

वसई, पालघर, ठाणे, मिरा भाईंदर या किनारपट्टी भागात मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव राहत आहे. त्यामुळे ईस्टर, गुड फ्रायडे आणि नाताळ असे सण वसई विरार आणि मिरा भाईंदर शहरात मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. २५ डिसेंबर रोजी दरवर्षी येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून नाताळ सण साजरा केला जातो. पण, या सणाला खरी सुरुवात होते ती नाताळच्या चार आठवडे आधी. त्यानुसार ३० नोव्हेंबरपासून या सणाला सुरुवात झाली आहे. या दिवशी आलेला रविवार हा चार पवित्र रविवारांपैकी पहिला रविवार. या दिवशी शहरातील सर्व चर्चमध्ये आनंदाचे वातावरण होते. धार्मिक विधीसाठी ख्रिस्ती बांधवा एकत्र आले होते.

प्रभू येशू ख्रिस्ताला लहान मुले आवडतात असे म्हटले जाते. त्यामुळे वसई विरारमधील चर्चमध्ये खासकरून लहान मुलांच्या हस्ते मेणबत्त्या लावून आगमन काळाचे उद्घाटन करण्यात आले. पहिल्या रविवारी जांभळ्या रंगाची मेणबत्ती लावली जाते. मेणबत्ती स्वतः जळून आपल्या आसपासचा परिसर प्रकाशमान करते. त्यातून बोध घेऊन समाजातील प्रत्येक व्यक्तीने इतरांसाठी जगण्याच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. मेणबत्ती म्हणजे प्रभू येशूचा प्रकाश आहे. नकारात्मक विचारांनी व्यापलेल्या भोवतालात सकारात्मकतेची दिशा देण्याचे काम ही मेणबत्ती करते, असेही आगमन काळातील मेणबत्तीचे महत्त्व आहे.

हा आगमन काळ म्हणजे एकप्रकारे मनाला आग लावणारा आहे. मनात असलेले दृष्ट व वाईट विचार बाजूला होऊन चांगल्या विचार आचरणात आणण्याचा हा काळ असल्याचे फादर ज्यो अल्मेडा यांनी सांगितले आहे. तर पहिल्या रविवारी लावली जाणारी मेणबत्ती म्हणजेच आशेची मेणबत्ती आहे. माणसाने निराश न होता नेहमीच आशावादी राहिले पाहिजे. पहिली जांभळी मेणबत्ती लागल्यानंतर या आठवड्यात जी लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना केली जाईल असे भुईगाव चर्चचे फादर विजयकुमार लोपीस यांनी सांगितले आहे.

जांभळ्या रंगाच्या मेणबत्तीचे महत्त्व काय?

ख्रिस्ती धर्मश्रद्धेनुसार, जांभळा रंग आशेचे प्रतीक आहे. प्रभू येशू ख्रिस्त मानवाच्या कल्याणासाठी जगात येत आहेत, या आशेची जाणीव ही मेणबत्ती प्रज्वलित केल्याने होते. येशूच्या जन्माच्या सातशे वर्षांपूर्वी संदेष्टा यशयाने त्याच्या जन्माचे भाकीत करून लोकांना पापमुक्ती आणि तारणाची आशा दिली होती. त्याचेही प्रतीक म्हणून ही जांभळ्या रंगाची मेणबत्ती लावली जाते.