वसई: नाताळ सणानिमित्त वसई विरारमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. ख्रिसमस ट्री, नाताळ तारा तसेच इतर रंगीबेरंगी सजावटीच्या साहित्यामुळे शहरातील बाजारपेठा सजू लागल्या आहेत. तर दुसरीकडे ख्रिस्ती बांधवांची सजावट साहित्य खरेदी करण्यासाठी लगबगही सुरू झाली आहे.

वसई विरारच्या पश्चिम पट्ट्यात मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव राहतात. त्यामुळे वसईतही मोठ्या जल्लोषात नाताळचा साजरा केला जातो. नाताळ सणाला अवघे दोन आठवडे शिल्लक असताना मुख्य बाजारपेठा, शहरातील विविध चर्च, तसेच शाळा महाविद्यालयांचे आवार अशा विविध ठिकाणी उभारण्यात आलेली लहान-मोठी दुकाने नाताळ सजावटीच्या साहित्याने सजू लागली आहेत. या सणाच्यानिमित्ताने वसईतील विक्रेत्यांनी लाखो रुपयांची उलाढाल करून  बाजारात नव नवीन सजावटी साहित्य विक्रीसाठी आणले आहे. दरवर्षी नाताळ सणात काही न काही नवनवीन वस्तू बाजारात येत असतात. त्या खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असतो. तर काही जण विविध संकल्पना मांडण्याच्या हेतूने साहित्यांची खरेदी करीत असतात.

यंदा बाजारात ख्रिसमस ट्री, ख्रिसमस टॉवर, नाताळ गोठे व ते तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, सांताक्लॉज, ख्रिसमस टोपी, स्नोमॅन, नाताळ तारा, रेन डीअर, लहान मुलांसाठी आकर्षक खेळणी, सांताक्लॉजचा पेहराव, विद्युत रोषणाईसाठीचे साहित्य,सुशोभित वेली, भेटवस्तू देण्यासाठी आकर्षक भेटकागद, पिशव्या, भेटकार्ड अशा विविध प्रकारच्या साहित्यांने बाजारपेठा बहरल्या आहेत.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सामानाच्या किंमतीत १० ते १५ टक्के वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. मात्र, घरगुती तसेच कार्यालयांच्या ठिकाणी सजावट करण्यासाठी ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर सामानाची खरेदी केली जात असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

गोलाकार नाताळ हाराला मागणी

ख्रिसमस वेथ म्हणजे फुलांचा आणि पानांचा गोलाकार हार, जो येशूच्या जन्माच्या आनंदोत्सवाचे आणि अनंतकाळच्या जीवनाचे प्रतीक म्हणून वापरला जातो. याला नाताळचा हार असेही म्हटले जाते. नाताळ सणाच्या दिवसात दरवाजे तसेच घरांमध्ये लावण्यासाठी, सजावटीसाठी या हाराचा वापर केला जातो. यंदा बाजारात लहान मोठ्या आकाराचे, ख्रिसमस बेल, लाल फिती, फुले यांनी अशी सजावट केलेले प्लास्टिकचे तसेच कागदाचे नाताळ हार विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. तर १०० ते ६०० रुपयांपर्यंत त्यांची विक्री केली जात आहे.

नाताळ ताऱ्याला महत्त्व

ख्रिसमस नाताळच्या सणात नाताळ तारा हा महत्वाचा समजला जातो. नाताळचा आगमनकाळ सुरू झाल्यापासून नाताळ तारा लावण्यास सुरुवात होते. यंदा बाजारात विविध रंगेबेरंगी, विविध रंग छटा असलेले, पर्यावरणपूरक असे नाताळतारे विक्रीला आले आहेत. १०० रुपयांपासून ते ६०० रुपयापर्यँतचे नाताळ तारे विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.