विरार : शहरातील करोनाचा प्रादुर्भाव झपाटय़ाने कमी झाल्याने नागरिकांनी वर्धक मात्रेच्या लसीकरणाकडे पाठ फिरवली आहे. सध्या केवळ ४ टक्के नागरिकांनी वर्धक मात्रा घेतली आहे. सध्या करोनाचे सर्वच निर्बंध हटविल्याने वर्धक मात्रेची आवश्यक काय, असा सवाल करत मागील काही दिवसांपासून वर्धक मात्रा घेण्यासाठी नागरिक पुढे येत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे पालिकेच्या चिंता वाढल्या आहेत. पालिका आवाहन करूनही वर्धक मात्रेसाठी नागरिकांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे.
शासनाने करोनाविषयकनिर्बंध शिथिल केले आहेत, तर वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात मागील महिनाभरापासून रुग्ण अतिशय कमी रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे नागरिक लसीकरण करून घेण्यासाठी पुढे येत नाहीत. पालिकेने सामान्य नागरिकांतील एकूण १२० टक्के नागरिकांना पहिली मात्रा दिली, तर ११४ टक्के नागरिकांना दुसरी मात्रा दिली आहे. यात शासनाकडून आरोग्य सेवक, पहिल्या फळीतील सेवक आणि ६० वर्षांवरील व्याधीग्रस्त नागरिकांसाठी वर्धक मात्रा घेणे सक्ती केली असल्याने या गटातील दोन मात्रा पूर्ण केलेल्या सर्व नागरिकांना तिसरी वर्धक मात्रा देण्याचे शासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यानुसार पालिका या गटातील नागरिकांचे लसीकरण करीत आहे. जानेवारी महिन्यापासून ७१ टक्के आरोग्य सेवकांना वर्धक मात्रा देण्यात आली आहे. पहिल्या फळीतील ६७ टक्के नागरिकांना तर ४५ ते ५९ वयोगटातील ०.१ टक्के नागरिकांनी वर्धक मात्रा घेतली आहे. तर ६० वर्षांवरील १२.३ टक्के नागरिकांनी वर्धक मात्रा घेतली आहे.
व्याधीग्रस्त तर १८ ते ४५ वयोगटातील एकही नागरिकांनी वर्धक मात्रा घेतली नाही. पालिकेकडे लशींचा अतिरिक्त साठा असूनही नागरिकच वर्धक मात्रेसाठी पुढे येत नसल्याचे सांगितले जात आहे. करोना अजूनही संपला नसून नागरिकांनी आपली वर्धक मात्रा घ्यावी, असे आवाहन पालिकेने केले आहे.