विरार : करोनाकाळानंतर बांधकाम व्यवसायाला चालना मिळाली असली तरी बांधकाम करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमती तीन ते चार पट वाढल्याने वसई- विरारमध्ये घराच्या किमती वाढल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे आता वसई-विरारमध्ये घरे घेणे सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर जाणार आहे. वाढती महागाई अशीच राहिली तर २५ ते ३० टक्के घराच्या किमती वाढतील, असे संकेत बांधकाम व्यावसायिकांनी दिले आहेत.
करोनाकाळात डबघाईला आलेला बांधकाम व्यवसाय करोनाकाळानंतर आपली घडी बसवत असताना वाढत्या महागाईमुळे पुन्हा अडचणीत सापडला आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेने महागाईमुळे बांधकाम साहित्यात दुपटी तिपटीने वाढ झाली आहे. तर स्टील आणि वाळू यांच्या किमती अवाच्या सवा वाढल्या आहेत. यामुळे बांधकामासाठी लागणारा खर्च वाढला आहे. त्यात रेरामुळे रेडीरेकनरमुळे घरांच्या किमती वाढवता येत नसल्याने विकासक हवालदिल झाले आहेत.
वसई-विरारमध्ये मुंबईच्या तुलनेने घराच्या मागील नफा कमी आहे, त्यात करोनाकाळात अनेकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला, मजुराचे दर वाढले आहेत. तसेच सततच्या इंधनाच्या दरवाढीमुळे छोटय़ामोठय़ा वस्तूचे दरसुद्धा झपाटय़ाने वाढत आहेत. जमीन आणि बांधकाम दर पकडून विकासकाला सध्या ४५०० ते ६००० रुपये प्रति चौरस फुट खर्च येत आहे. त्यात वाहनतळ आणि बगीचा दिल्याशिवाय पालिकेच्या परवानग्या मिळत नाहीत आणि त्यावर लागणारा शासनाचा कर यामुळे विकासकांची चांगलीच कोंडी झाली आहे. यामुळे करोनाकाळाआधी दिल्या जाणाऱ्या सुविधांवर विकासकांनी कात्री लावायला सुरुवात केली आहे.
सध्या रेरामुळे विकासकांना दिलेल्या वेळात इमारती बांधून देणे बंधनकारक असल्याने अनेक जण कर्ज काढून, बँकेच्या ठेवी गोठवून काम करत आहेत.
महागाईचा फटका विकासकांना सहन करावा लागत आहे. करोना काळात बंद असलेले प्रकल्प पुन्हा सुरु करताना सर्वच वस्तूच्या किमती दुपटी तिपटीने वाढल्या आहेत. घरे मात्र जुन्याच दराने विकावी लागत आहेत यामुळे विकासकांच्या आर्थक अडचणी वाढल्या आहेत.
-आजीव पाटील, वाय के ॲन्ड सन्स
करोना काळानंतर महागाईमुळे सर्वच साहित्याचे दर वाढले आहेत. त्यात शासनाकडून दरनिश्चिती असल्याने विकासक आर्थिक कोंडीत सापडले आहेत. मजुरी आणि इतर खर्च पकडून लागतसुद्धा मिळणे कठीण झाले आहे.-सचिन पाटील, वेद बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स, विरार